‘नागरी वस्तीबाहेर कबुतर पार्कसाठी निर्देश देणार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 08:22 IST2025-07-15T08:21:57+5:302025-07-15T08:22:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईमधील कबुतरखाने बंद करण्यात आल्यामुळे कबुतरांचा दाणापाणी बंद झाला आहे. परिणामी अचानक एकाद्या कॉलनीमध्ये ...

‘नागरी वस्तीबाहेर कबुतर पार्कसाठी निर्देश देणार’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईमधील कबुतरखाने बंद करण्यात आल्यामुळे कबुतरांचा दाणापाणी बंद झाला आहे. परिणामी अचानक एकाद्या कॉलनीमध्ये कबुतरांचे थवेच्या थवे आल्यास आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनू शकतो. त्यामुळे नागरी वस्तीबाहेर पार्क करण्यासाठी मुंबई महापालिकेला निर्देश दिले जातील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानपरिषदेत केली.
आ. सुनील शिंदे यांनी नियम ९३ अन्वये मुंबईचे कबुतरखाने बंद करण्यात आल्याने कबुतरांचे दाणापाणी बंद झाले आहे. त्यांना दाणे टाकणाऱ्या व्यक्तींकडून जबरस्तीने दंड वसूल केला जात आहे. हे पक्षी नष्ट होण्याची भीती आहे. खाणे बंद झाल्यामुळे ते नागरी वस्तीत जाण्याची शक्यता आहे. त्यांना वाचविण्यासाठी नागरी वस्तीबाहेर त्यांच्या दानापाण्याची व्यवस्था करणार का? असा सवाल केला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, मुंबई महानगरपालिका परिसरात खासगी मालकीचे ५१ कबुतरखाने आहेत. त्यातील २८ बंद असून २३ कबुतरखाने सुरू आहेत.
परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवरही कारवाई
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरामध्ये कबुतरखाना सुरू करण्यासाठी महापालिका
किंवा शासनामार्फत कोणतीही परवानगी दिली जात नाही, असे स्पष्ट केले आहे.
अघोषित क्षेत्रात पक्षी वा प्राणी यांना खायला घातल्यास प्रतिघटना ५०० रुपये, तर आंगण स्वच्छ न ठेवणे या कलमाअंतर्गत १०००/- दंड आकारण्यात येत आहे.
तर, घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत कबुतरांना अन्न देऊन परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.