Join us  

आवश्यकता असल्यासच शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश द्या... !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 5:44 PM

शिक्षकांना कोविड - १९ च्या कार्यातून मुक्त करण्याचेही निर्देश; शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण विभागाकडून निर्देश

मुंबई : लॉकडाऊन शिथिल होणार असल्यामुळे शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्षकांना शाळॆत उपस्थित राहण्याबाबत काही शैक्षणिक संस्था व शाळांकडून जबरदस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी शाळांमध्ये कसे व कधी उपस्थित रहावे यासाठी शैक्षणिक संस्थांना व शाळांना शिक्षण विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळा सुरु करण्याबाबत व शिक्षक उपस्थितीबाबत कोणत्याही सूचना देऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा सुरु करण्याची तयारी आणि ई लर्निंगसाठी मुख्याध्यापकांनी शिक्षकांना आवश्यकता असल्यास आठवड्यातून २ दिवस बोलावल्यास शिक्षकांनी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचेही सूचित करण्यात आले आहे.मुंबई ठाणे , पालघर, रायगड , नवी मुंबई जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध राहणार असल्याने शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू देण्याची सवलत द्यावी असे निर्देशांक म्हटले आहे. महिला शिक्षक, मधुमेह, शवसनाचे विकार असलेले, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजार असलेले व ज्यांचे वय ५५ वर्षावर आहे अशा शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत बोलावूनये असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्ष शाळा नियमित सुरु होईपर्यंत अशा शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा देण्यात यावी असे शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ज्या शिक्षकांची शाळेत गरज आहे अशाच शिक्षकांना मुख्याध्यापकांनी , शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुरूप बोलावून घेण्याचा निर्णय घ्यावा. एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळांमध्ये न बोलावता आठ्वध्यातून एक किंवा दोनच दिवस बोलावून घ्यावे असे निर्देश शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.ज्या शिक्षकांची सरप्लस म्हणून इतर आस्थापनेवर नियुक्ती करण्यात आली आहे त्या शिक्षकांना मूळ शाळेत बोलावून त्यांचा ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत उपयोग करून घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. ज्या शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत त्या शाळा मुख्याध्यापकाच्या ताब्यात येईपर्यंत तेथील कोणत्याही शिक्षकाला शाळॆत बोलावून घेऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.  आधी शिक्षकांना कोरोना ड्युटीतून मुक्त कराशिक्षकांना विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षकांना रेशन दुकाने , चेकपोस्ट , कोरोना सर्वेक्षण अशा ड्युट्या देण्यात आल्या आहेत. आधी शिक्षकांना या ड्युट्यांमधून मुक्त करावे तरच ते ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी पूर्ण वेळ देऊ शकतील अशी मागणी शिक्षक करत आहेत. जिल्ह्धिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडून या नियुक्त्या रद्द होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांमध्ये ज्या शिक्षकांच्या सेवा कोविड १९ साठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, त्यांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली असून त्यांना कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक