Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर रक्तदानाऐवजी होणार केवळ दात्याची नोंदणी

By स्नेहा मोरे | Updated: September 16, 2022 22:07 IST

मेगा रक्तदान मोहिमेत रक्ताचा अपव्यय टाळण्यासाठी रक्त संक्रमण परिषदेचा पुढाकार

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करणाऱ्या मेगा रक्तदान शिबिरांमध्ये रक्ताचा अपव्यय होण्याचा धोका आहे. कारण रक्तसाठ्याच्या संकलनाला ठराविक मुदत असल्याने योग्य वापर न झाल्यास ते वाया जाते. यावर तोडगा काढत आता राज्य रक्त संक्रमण परिषदेने अनोखी शक्कल लढविली आहे. रक्तदान शिबिरात सहभागी रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी रक्तदानाऐवजी दात्यांकडून केवळ नोंदणी केली जाणार आहे. जेणेकरुन भविष्यात रक्तसाठ्याचा तुटवडा भासल्यास तातडीने रक्तदाता उपलब्ध होईल.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गेल्या आठवड्यात सर्व राज्यांना यासंबंधित पत्र पाठवले आहे.  ही मोहीम १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी रक्तदान अमृतमहोत्सव सुरू होत आहे. यासाठी आरोग्य सेतू पोर्टल व ई-रक्तकोशवर नोंदणी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एका दिवशी एक लाख युनिट रक्त जमा करण्याच्या सूचना केंद्राकडून सर्व राज्यांना प्राप्त झाल्या आहेत.

या संकलनात रक्तसाठा वाया जाण्याची शक्यता अनेक संस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्तविली होती. केंद्राच्या निर्देशांप्रमाणे, सर्व राज्यांचा एकत्रित सहभाग या मोहिमेला मिळणे अपेक्षित आहे. प्रत्येक राज्यातून त्यांच्या गरजेनुसार रक्त संकलन व्हावे आणि त्याचा योग्य तो वापर व्हावा तसेच प्रत्येक राज्याने एकसमान सहभाग घ्यावा, असेही नमूद आहे.म्हणून निर्णय योग्यराज्य रक्त संक्रमण परिषदेच्या या निर्णयामुळे भविष्यातील रक्तसाठ्याचा तुटवडा भासणार नाही. रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत पुन्हा रक्तदान करता येत नाही. ही स्थिती लक्षात घेता, रक्तसाठ्याचा अपव्यय टाळण्यासाठी परिषदेने दात्यांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त  संक्रमण परिषदमुंबईतील काही रक्तपेढ्यांमध्ये यापूर्वीच गणेशोत्सवानिमित्त आयोजित शिबिरांमध्ये रक्तदान आयोजित केले गेले होते. त्यामुळे काही रक्तपेढ्यांमध्ये आधीपासूनच अधिकचा रक्तसाठा असून आता या रक्तपेढ्या रक्तसाठ्याविषयी परिषदेला कळवित आहे.त्यात गोरेगाव येथील मीनाताई ठाकरे रक्तपेढीत बी पाॅझिटिव्ह रक्तगटाचे 15 ऑगस्ट रोजी केलेले संकलन 26 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्याचे 40 युनिट उपलब्ध आहेत. तर ओ पाॅझिटिव्ह रक्तगटाचे 14 ऑगस्ट रोजी संकलित केलेले 3 युनिट 25 सप्टेंबर रोजी मुदतबाह्य होणार आहे. तर साऱख्या रक्तगटाचे 15 ऑगस्ट रोजी संकलित केलेले 37 युनिट 26 सप्टेंबर रोजी मुदतबाह्य होणार आहे.

टॅग्स :रक्तपेढीनरेंद्र मोदी