नाक्या-नाक्यावर माफियाराज, वाहतूक पोलिसांचे हप्ते थांबवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 10:13 IST2025-05-26T10:13:05+5:302025-05-26T10:13:18+5:30
रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात, याबाबत एक मोठा गैरसमज पसरवण्यात येत आहे

नाक्या-नाक्यावर माफियाराज, वाहतूक पोलिसांचे हप्ते थांबवा
शशांक राव
अध्यक्ष, ऑटोरिक्षा संघटना कृती समिती
रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात, याबाबत एक मोठा गैरसमज पसरवण्यात येत आहे. रिक्षाचालकांना नियमबाह्य वाहतुकीबाबत दोष देणे सोपे असले, तरी खरे चित्र वेगळे आहे. ज्याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जाते, तेथे नाक्यानाक्यावर माफियाराज सुरू आहे. तेथे स्थानिक वाहतूक पोलिसांना हप्ते दिले जातात. ते थांबविण्याची हिंमत प्रशासनात नाही, असा गंभीर आरोप ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत केला.
ऑटो रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात..?
उत्तर : एमएमआरमध्ये जवळपास साडेचार लाख रिक्षा असून, जवळचे भाडे नाकारले जाते, हा चुकीचा समज पसरविण्यात येत आहे. जर भाडे नाकारले जात असतील, तर रिक्षाचालकांचे घर कसे चालणार? जवळच्या भाड्यासाठी मोठ्या प्रमाणात शेअर ऑटो आहेत. बस आणि रेल्वे स्थानकांजवळ सहसा भाडे नाकारले जात नाही. त्यामुळे अॅग्रीगेटरला संधी दिल्यानंतर भाडे नाकारले जाणार नाही, हे गृहीतक चुकीचे आहे. ते तर भाडे स्वीकारून नंतर नाकारतात. रिक्षाचालकाने भाडे नाकारले, तर त्याला १,५०० रुपयांचा दंड असून, १५ दिवस परवाना रद्द केला जातो. शहरांमध्ये बेकायदा बाइक टॅक्सी सुरू असली, तरी त्यावर शासनाचा वचक नाही.
क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक, नियम न पाळणाऱ्या रिक्षांवर तुम्ही काय कारवाई करता?
उत्तर : वाहतूक पोलिसांची यात मोठी जबाबदारी असून, नियम मोडणाऱ्या ऑटो रिक्षाचालकांकडून लाच घेतात. याबद्दल आम्ही तक्रारी करून थकलो आहोत. ज्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जाते, तेथे नाक्यानाक्यावर माफियाराज सुरू असून, तेथे स्थानिक वाहतूक पोलिसांना हप्ते दिले जातात. ते थांबविण्याची हिंमत प्रशासनात नाही. त्यावर कारवाई होत नाही. दुसरीकडे प्रामाणिक रिक्षाचालकांना इतर काही गोष्टींमध्ये अडकवून कारवाई केली जाते, मात्र जादा प्रवासी नेणाऱ्या चालकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे अवैध वाहतुकीला रोखण्यासाठी २४ तास एक पथक तैनात करण्याचे मागणी केली होती. मात्र, त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. त्याचा फटका प्रामाणिक रिक्षाचालकांना बसतो.
बाइक टॅक्सीमुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. असे असताना त्याला विरोध का ?
उत्तर : वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ई-बाइक टॅक्सी हा एकच पर्याय असेल, तर सरकारने ऑटो रिक्षा, टॅक्सी, बेस्ट बस आणि ओला उबर बंद करून फक्त ई-बाइक टॅक्सी चालवावी. मेट्रो स्थानकांखाली अद्यापही आम्हाला रिक्षा स्टॅण्ड देण्यात आलेले नाही. त्यामुळे खरोखरच प्रवाशांचा वेळ वाचवायचा असेल, तर आमची मागणी का पूर्ण केली जात नाही. रिक्षांना स्टॅण्ड नाही, ई-बाइक टॅक्सी कुठे उभी करणार?
बाइक टॅक्सीमुळे शहरात रोजगार निर्मिती होतील. मग, रोजगार कमी होण्याचा आक्षेप का?
उत्तर : सरकारच्या म्हणण्यानुसार मुंबईमध्ये १० हजार रोजगार निर्माण होतील. सध्या मुंबईमध्ये २.५ लाख रिक्षा आहेत, तर राज्यात १५ लाख. जर रोजगारच द्यायचा असेल, तर ऑटो रिक्षा हा पर्याय आहे. रिक्षा-टॅक्सी सुरू करताना इतर पर्याय निर्माण करण्यासाठी खासगी भांडवलदारांना सरकार हाताशी धरत आहे.
==============================