Join us

चरित्रकारांकडून संभाजी महाराजांवर अन्याय, पण..; छावा सिनेमाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 23:08 IST

छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित, कवी आणि लेखकही होते. त्यांच्यावर चरित्रकारांनी अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने तो दूर झाला, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

CM Devendra Fadnavis: "छत्रपती संभाजी महाराज वीर पुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. चरित्रकारांनी त्यांच्यावर अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने ऐतिहासिक तत्व कायम ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित केला," असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स थिएटरमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य, मंत्री यांच्यासाठी आयोजित छावा चित्रपटाचा शोप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र, शौर्य, वीरता, चातुर्य, अतुलनीय विद्वता जनसामान्यांपर्यंत संपूर्ण देशभर छावा चित्रपटाच्या कलाकार आणि सर्व टीमने पोहोचवली. ११ भाषा अवगत असणारे छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित, कवी आणि लेखकही होते. त्यांच्यावर चरित्रकारांनी अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने तो दूर झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते छावा चित्रपटातील कलाकार संतोष जुवेकर आणि इतर कलाकार, प्रोडक्शन टीमचे संजय पाटील यांचे  छावा पुस्तक देऊन अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान, यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर, विधिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीस'छावा' चित्रपटछत्रपती संभाजी महाराज