Injustice of 'delay charges' on power consumers in Mumbai | मुंबईतल्या वीजग्राहकांवर ‘विलंब शुल्का’चा अन्याय

मुंबईतल्या वीजग्राहकांवर ‘विलंब शुल्का’चा अन्याय

मुंबई : जून महिन्यात हाती पडलेले भरसाट वीजबिल मासिक हप्त्यांमध्ये (ईएमआय) भरण्याचा पर्याय राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) ग्राहकांना दिला असला तरी त्या थकबाकीवर विलंब आकार व्याजासह आकारण्याची मुभाही वीज कंपन्यांना दिली आहे. महावितरणने ग्राहकांना त्यातून सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबईकरांना वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्या एमईआरसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही आकारणी करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे ईएमआयचा पर्याय निवडणाºया मुंबईतल्या वीजग्राहकांना थकबाकीवर १२ ते १४ टक्के व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात मीटर रीडिंग अशक्य असल्याने राज्यातील वीजग्राहकांना सरासरी बिल पाठवले जात होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रीडिंगनुसार आकारणी सुरू झाली. उन्हाळ्यात झालेल्या अतिरिक्त वीजवापराचे बिल जून महिन्यात हाती पडले. त्या बिलांनी भरपावसाळ्यात अनेकांना घाम फोडला आहे. त्यामुळे निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी बिलांची रक्कम मासिक हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. मात्र, त्यात विलंब आकार व्याजासह वसूल होणार असल्याने ही सवलत ग्राहकांचा खिसा कापणार आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी विलंब शुल्क आणि व्याज आकारणीतही सवलत देण्याची घोषणा केली आहे. महावितरणही त्याची अंमलबजावणी करणार आहे.

मुंबईकरांना वीजपुरवठा करणाºया बेस्ट, टाटा आणि अदानी पॉवर या वीज कंपन्यांच्या प्रवक्त्यांना त्याबाबत विचारणा केली असता आम्ही एमईआरसीच्या निर्देशानुसारच बिल आकारणी करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईतील ४७ लाखांपैकी जे ग्राहक ईएमआयचा पर्याय निवडतील त्यांना थकबाकीच्या रकमेवरील विलंब आकार व्याजासह अदा करावा लागणार आहे. महावितरणचे धोरण तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सवलत घेतलेल्या ग्राहकांनी चालू महिन्याचे बिल आणि त्या महिन्याचा हप्ता जर देय दिनांकापर्यंत भरला तर त्याला कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, हप्ता निर्धारित वेळत भरला न गेल्यास नियमानुसार ही आकारणी केली जाईल, असे महावितरणच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

ईएमआयचा पर्याय निवडणाºया ग्राहकांनी चालू महिन्याच्या बिलासोबत पहिला हप्ता भरल्यानंतर जी थकबाकी असेल त्यावरील विलंब शुल्क आणि व्याज पुढील महिन्याच्या बिलांमध्ये आकारले जाईल. हा निर्णय वीज कंपन्यांचा नव्हे तर एमईआरसीचा आहे. एमईआरसीने त्यात सवलत देण्याचे निर्देश दिले तर आम्ही त्याचे पालन करू, असे मुंबईला वीजपुरवठा करणाºया कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांसाठी नियम समान हवा

एकत्र वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित महाराष्ट्रातील ग्राहकांना दोन टक्के सवलत देण्यात आली आहे. शिवाय विलंब शुल्कावरील व्याजही त्यांना माफ केले आहे. मात्र, मुंबईतील ४७ लाख वीजग्राहकांना यापैकी कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. राज्यातील वीजग्राहकांच्या धोरणांबाबत एकवाक्यता नसून मुंबईकरांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. सवलती आणि नियम हे सर्व वीजग्राहकांसाठी समानच असायला हवेत, असे मत वीज अभ्यासक अशोक पेंडसे यांनी व्यक्त केले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Injustice of 'delay charges' on power consumers in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.