Join us
Daily Top 2Weekly Top 5

बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी जबाब नोंदविण्यास सुरुवात; तपासाची व्याप्ती वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 06:46 IST

राज्यात जसा तेलगी स्टॅम्प घोटाळा झाला तसाच सध्या शंभर कोटींचा स्टॅम्प घोटाळा झाला आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वांद्रे न्यायालयाबाहेरून जप्त करण्यात आलेल्या ४ हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रांच्या तपासाची व्याप्ती वाढली असून, गुन्हे शाखेच्या चार पथकांनी प्रतिज्ञापत्रातील नागरिकांची चौकशी करुन जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. 

ही प्रतिज्ञापत्रे कोणी आणि कशी बनवली, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. वांद्रे न्यायालयात कामानिमित्त आलेल्या एका सेवानिवृत्त बीएआरसी कर्मचाऱ्याने या प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे बघितले होते. त्यावर नोटरीचा स्टॅम्प मारून सह्या केल्या जात होत्या. याची माहिती मिळताच, निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ४ हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे ताब्यात घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.

ठाकरे गटाकडून शिवसैनिकांची ही खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यासाठी तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेने मुंबईत काही जणांकडे चाैकशी करून त्यांचे जबाब नोंदविले आहेत. प्रतिज्ञापत्रांच्या छाननी आणि आतापर्यत केलेल्या तपासाच्या आधारे याचा पुढील तपास करण्यासाठी पथके ठाणे, पालघर, कोल्हापूर, अहमदनगर आणि नाशिक अशा विविध ठिकाणी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शंभर कोटींचा बनावट स्टॅम्प घोटाळा : उदय सामंत

चिपळूण (जि. रत्नागिरी) : राज्यात जसा तेलगी स्टॅम्प घोटाळा झाला तसाच सध्या शंभर कोटींचा स्टॅम्प घोटाळा झाला आहे. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार जवळपास शंभर कोटींचे स्टॅम्प बनावट नावांनी विकत घेतले गेले आहेत. त्याची चौकशी आता राज्य सरकारने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोपरगावातील प्रतिज्ञापत्रे निघाली खरी!

कोपरगाव (जि. अहमदनगर) : येथील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिलेल्या  प्रतिज्ञापत्रांची तपासणी पूर्ण झाली. तीन दिवसांत तब्बल २०० प्रतिज्ञापत्रांची तपासणीसह प्रतिज्ञापत्र देणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. ही सर्वच प्रतिज्ञापत्रे खरी असल्याचे केलेल्या तपासात आढळून आले, अशी माहिती मुंबई क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर सानप यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबई