Join us

कंगनासह अर्णब गोस्वामीवर हक्कभंग; ठरावावर कामकाज सल्लागार समितीत निर्णय होण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 23:47 IST

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत मांडला.

मुंबई : सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांचा अवमान केल्याप्रकरणी तिच्यावर विधानपरिषदेत हक्कभंग दाखल करण्यात आला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत मांडला. संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी सुपारी बहाद्दर, टीनपाट पत्रकार भाजपने स्पॉन्सर केले आहेत का? असा सवाल केला. तर समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी यांनी अर्णब गोस्वामी केंद्र सरकारची चापलुसी करतो. त्याला तुरुंगात पाठवा, अशी मागणी केली.

उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज झाले. सध्या हक्कभंग समिती अस्तित्वात नसल्याने या ठरावावर कोणी निर्णय द्यायचा, हे स्पष्ट नाही. कदाचित कामकाज सल्लागार समितीत त्यावर निर्णय होऊ शकतो.अर्णबची

चौकशी होणार

अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्ही चॅनलच्या स्टुडिओचे काम करणारे आर्किटेक्ट अन्वय नाईक यांचे ८५ लाख रुपये अर्णब यांनी दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार नाईक यांच्या पत्नीने केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

कंगनाच्या निषेधाचा ठराव

मुंबई पोलीस आणि महाराष्ट्रबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौत हिच्या निषेधाचा ठराव विधानसभेत मांडला गेला. आपण देखील कंगनाच्या विधानाचे समर्थन करत नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :अर्णब गोस्वामीकंगना राणौत