महागाईचा फटका; मुंबईत पालेभाज्यांची आवक घसरल्याने बाजारभाव वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 06:26 IST2019-10-30T01:25:58+5:302019-10-30T06:26:03+5:30
कोथिंबीर २५ रुपये : पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने परिणाम

महागाईचा फटका; मुंबईत पालेभाज्यांची आवक घसरल्याने बाजारभाव वाढले
नवी मुंबई : राज्यभर पडलेल्या पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. मुंबई बाजारसमितीमधील आवक घसरली असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. कोथिंबिरीची एक जुडी गेल्या आठवड्यामध्ये २० ते ३० रुपयांना विकली जात होती. त्यामध्ये वाढ होऊन ती २५ ते ५५ रुपयांवर गेली आहे.
मुंबई बाजारसमितीमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० ट्रक व टेंपोंमधून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. मुंबई, नवी मुंबई परिसरासाठी रोज ६ ते ७ लाख पालेभाज्यांच्या जुड्यांची गरज असते. सद्यस्थितीमध्ये सरासरी साडेचार ते पाच लाख जुड्यांचीच आवक होऊ लागली आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये आठवड्यापुर्वी कोथिंबिरीची जुडी २० ते ३० रुपयांना विकली जात होती. त्यामध्ये वाढ होऊन २५ ते ५५ रुपयांवर गेली आहे. किरकोळ मार्केटमध्येही कोथिंबिरीच्या जुडीला दुप्पट किम्मत मोजावी लागत आहे. शेपू, मेथी व इतर भाज्यांच्या दरामध्येही वाढ झाली आहे.
मुंबईमध्ये नाशिक, पुणे, सातारा परिसरामधून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. राज्यभर पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. पुढील १५ दिवस आवक कमीच राहण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी प्रतिनिधी शंकर पिंगळे यांनी दिली आहे.
मुंबई बाजारसमितीमधील एका आठवड्यातील बाजारभाव वस्तू २२ ऑक्टोबर २९ ऑक्टोबर
कोथिंबीर २० ते ३० , २५ ते ५५
मेथी १५ ते ४० , २० ते ४०
पालक ८ ते १५, १० ते २५