छोट्या पथकांवर महागाईचे संकट, स्पर्धांमुळे झाली मिळणाऱ्या निधीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:44 IST2025-08-09T10:43:11+5:302025-08-09T10:44:12+5:30

आर्थिक शिस्त पाळण्यासाठी करावी लागते कसरत

Inflation crisis hits small teams, competition leads to reduction in funds received | छोट्या पथकांवर महागाईचे संकट, स्पर्धांमुळे झाली मिळणाऱ्या निधीत घट

छोट्या पथकांवर महागाईचे संकट, स्पर्धांमुळे झाली मिळणाऱ्या निधीत घट

महेश पवार

मुंबई : गोविंदांचे थर, ढोल-ताशांचा निनाद, हजारोंच्या टाळ्यांचा गजर हा सोहळा अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडतो. परंपरा जपून, संस्कृतीचा सन्मान राखून काही स्थानिक आणि लहान मंडळे आजही उत्साहात सण साजरा करताहेत. मात्र, वाढती महागाई, बक्षिसांसाठी गोविंदामध्येच लागणाऱ्या स्पर्धा, लोकांकडून मिळणाऱ्या निधीत झालेली घट यामुळे छोट्या मंडळांना आर्थिक शिस्त पाळण्याची कसरत करावी लागत आहे.

मुंबई महानगर प्रदेश परिसरात नोंदणीकृत सुमारे १,३०० छोटी, मोठी गोविंदा पथके आहेत. यातील मोठी पथके मोठ्या रकमेच्या दहीहंड्या फोडून त्यामधून पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन करतात. शिवाय त्यांच्या माध्यमातून जाहिरात होत असल्याने राजकीय नेतेही वस्तू, देणगी रूपात मदत करतात. मात्र, या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी छोट्या मंडळांना सण साजरे करण्यासाठी वर्षभराचे नियोजन आधीच करावे लागते. 
मुंबईत १९८६ पासून दहीहंडी उत्सव साजरा करणारे सर्वात जुने माझगावचे श्री दत्त गोविंदा पथकाचे सतीश पेडणेकर म्हणाले की, फेरबंदरचे संघर्ष, घोडपदेवच्या बोरकरांचा गोविंदा, करी रोडचा बालवीर अशी काही जुनी मंडळे होती. १९९८ साली गोविंदाची संख्या मोठी असल्याने ८ थर लावले. मैदानात टेबल मांडून गोविंदाची वर्गणी जमा करायचो. शहरात स्लम विभाग व छोटी घरे असल्याने कुटुंब विभक्त झाली. परिणामी गोविंदांची संख्या कमी होऊन आर्थिक गणित बिघडले. 

आमच्यासारख्या छोट्या मंडळांसाठी बजेट हा चिंतेचा विषय आहे. मात्र, स्थानिक दुकानदार, नागरिक व सदस्यांची वर्गणी, खर्चाचे योग्य नियोजन, पारदर्शकता, लोकसहभाग याच्या जोरावर हा सण उत्साहाने पार पाडतो. काही ज्येष्ठ सदस्य स्वतःहून आर्थिक किंवा वस्तू रूपात मदत करतात. दहीहंडी फोडून काही ठिकाणी मोठी तर काही ठिकाणी तुटपुंजी रक्कम मिळते. ती देखील पथकाच्या खर्चासाठी उपयोगात आणली जाते. गोविंदाच्या सुरक्षेसाठी फर्स्ट एड किट, पुरेसे पाणी, अपघात विमा याला प्राधान्य दिले जाते. वर्गणी व खर्चाची माहिती प्रत्येकाला दिल्यामुळे विश्वास वाढतो.
विकास महादेव पवार, 
जय महाराष्ट्र गोविंदा पथक, भायखळा

विम्यामुळे भार हलका
राज्य सरकारने यंदापासून १.५० लाख गोविंदांना विमा सरंक्षण देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा प्रस्ताव मान्य केला. 
१,१२,५०,००० रुपये इतक्या रकमेचा प्रस्ताव अंतिम केला असून, मृत्यू, अपंगत्व आणि वैद्यकीय खर्चाच्या भरपाईची यात तरतूद आहे. संपूर्ण प्रीमियम सरकार भरणार आहे. 
महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून गोविंदा पथकांची आवश्यक कागदपत्रे घेऊन नोंदणी केली आहे. यामुळे अनेक छोट्या मंडळाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर यांनी दिली.

मंडळाला येणारा अंदाजित खर्च 
लाइटिंग     २,००० 
बॅनर, पोस्टर, जाहिरात     २,०००
स्थानीय परवानगी     ३,०००
आकस्मिक खर्च     ३,०००
साउंड सिस्टीम, माइक     ३,०००
सजावट साहित्य     ४,०००
मंडप भाडे     ४,०००
पथकांना बक्षिसे     ५,०००

१५० गोविंदांसाठी येणारा अंदाजित खर्च 
नाश्ता, जेवण, पाणी     १५,०००
टी शर्ट, शॉर्ट्स, नॅपकिन     २०,०००
वाहतूक खर्च     २०,०००
आपत्कालीन दुखापत     १०,०००
इतर अनपेक्षित खर्च     १०,०००
एकूण     ७५,०००

असे आहे विमा संरक्षण  
मृत्यू : १० लाख रुपये 
अपंगत्व : १० लाख रुपये (दोन्ही डोळे, दोन्ही हात-पाय गमावल्यास) 
अंशतः अपंगत्व : ५ लाख रुपये (एक डोळा, हात - पाय गमावल्यास) 
वैद्यकीय खर्च : १ लाख रुपये (मनोरे रचताना झालेल्या दुखापतींच्या उपचारासाठी)
 

Web Title: Inflation crisis hits small teams, competition leads to reduction in funds received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.