मुंबई - बांगलादेशातील बेरोजगारी, उपासमारीला कंटाळून भारतात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत बांगलादेशी नागरिकांवर कारवाई वाढलेली आहे. त्यातही मागील तीन वर्षांत हजारहून अधिक जणांवर अटकेची कारवाई झाली असून, त्या तुलनेत या घुसखोरांना मायदेशी पाठवण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. अवघ्या हजार ते दोन हजार रुपयांत ही मंडळी भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रे मिळवत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
बांगलादेशातून अवैध मार्गाने सीमारेषा ओलांडून भारतात येणारे घुसखोर बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पॅनकार्ड तयार करून भारतात राहतात. या घुसखोरांना आवश्यक कागदपत्रे बनवून देण्यात अनेकदा भारतीय नागरिकच मदत करतात.
१,१७३ जणांना अटकशिवाय हे घुसखोर झोपडपट्टी परिसरात राहात असल्याने त्यांची ओळख पटणे लवकर शक्य होत नाही. तरीही मुंबईतील सर्व पोलिस ठाणी व गुन्हे शाखा, तसेच एटीएस व एनआयएमार्फत नियमितपणे बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात येते. गेल्या तीन वर्षांत १ हजार १७३ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे तर २५९ घुसखोरांना परत त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक अटकेची कारवाई २०२५ वर्षात करण्यात आली आहे.
७ वर्षांत ८५ बांगलादेशींनी बनवले बनावट पारपत्रराज्य दहशतवादविरोधी पथकाने यापूर्वी केलेल्या कारवाईत अटक केलेला आरोपी रफीक शेखने ७ वर्षांत ८५ बांगलादेशी नागरिकांना बनावट पारपत्र तयार करून दिल्याचे समोर आले होते.
शेख हा स्वतः साक्षीदार राहून अर्जदारासाठी बनावट भाडेकरार, शपथपत्र, पॅनकार्ड तयार करून घेत असे. त्यानंतर अर्जदाराच्या पॅनकार्डच्या आधारे आधारकार्ड तयार करून घेत असे. पुढे शाळा सोडल्याचा, जन्मतारखेचा बनावट दाखला तयार करून सर्व कागदपत्रांच्या आधारे पारपत्रही मिळवण्यासाठी तो पाठपुरावा करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.