धक्कादायक! 'नकोशा' अर्भकाचा मृतदेह वर्सोव्यात सापडला, परिस्थिती पाहून पोलीसही हादरले
By गौरी टेंबकर | Updated: December 16, 2024 15:31 IST2024-12-16T15:30:47+5:302024-12-16T15:31:43+5:30
पेपरमध्ये गुंडाळलेल्या एका नवजात बालकाचा मृतदेह वर्सोवा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतला.

धक्कादायक! 'नकोशा' अर्भकाचा मृतदेह वर्सोव्यात सापडला, परिस्थिती पाहून पोलीसही हादरले
गौरी टेंबकर - कलगुटकर
पेपरमध्ये गुंडाळलेल्या एका नवजात बालकाचा मृतदेह वर्सोवा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर या बाळाच्या अंगावर कावळे बसून त्याचे लचके तोडत होते. ज्यांना हटवत पोलिसांनी पुढील कारवाई करत त्याच्या पालकांविरोधात बीएनएस कायद्याचे कलम ९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
वर्सोवा पोलीस ठाण्यात काम करणारे प्रकाश शिरसागर (३७) हे १५ डिसेंबर रोजी गस्तीवर होते. त्यांना मुख्य नियंत्रण कक्षाकडून एक संदेश प्राप्त झाला. त्यामध्ये वर्सोवाच्या अवर लेडी चर्च परिसरात एक बेवारस अर्भक पडलेले असून पोलीस मदत मागण्यात आली होती. त्यानुसार प्रकाश हे त्यांच्या अन्य पोलीस सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मोहम्मद अरुण नावाच्या व्यक्तीने पोलिसांना हाऊस ऑफ
चारिटीच्या (Charity) बाजूला नेले. त्या ठिकाणी असलेले दृश्य पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला. प्रकाश यांनी एफआयआरमध्ये दिलेल्या निवेदनानुसार, सदर नवजात अर्भकाच्या अंगावर कावळे बसलेले होते. जे त्याच्या पाठीमागच्या भागावरील मास खात होते. ते पाहून प्रकाश यांनी लगेचच त्या कावळ्यांना तिथून हुसकावून लावले आणि याबाबत वरिष्ठांना कळवले. बाळाच्या पाठीमागे आणि खांद्यावर पेपर गुंडाळल्याने त्याच्या अंगाला तो कागद चिकटला होता. ते पुरुष जातीचे अर्भक होते ज्याची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यासाठी त्याला टाकून दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने त्या अर्भकाला कूपर रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे डॉक्टरांनी ते अर्भक दाखलपूर्व मयत घोषित केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस सदर पालकांचा शोध घेत आहेत.