मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्तक्षेपामुळे मोजांबिकमधून भारतीय कामगाराचे पार्थिव भारतात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:06 IST2025-11-20T18:05:23+5:302025-11-20T18:06:16+5:30
कुटुंबीयांनी या प्रकरणात येणाऱ्या अडचणींबाबत लेखी विनंती करून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मदतीची मागणी केली होती.

मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्तक्षेपामुळे मोजांबिकमधून भारतीय कामगाराचे पार्थिव भारतात दाखल
केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या माध्यमातून स्व. मधुकर सुपधू अहिरे (रा. उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र) यांचे, मोजांबिकमधील नाम्पुला येथे दि, १३ नोव्हेंबर रोजी निधन झाल्यानंतर, त्यांचे पार्थिव भारतात परत आणण्याची सर्व औपचारिक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात आली. दिवंगतांचे पार्थिव आज मुंबईत दाखल झाले आहे.
दिवंगत अहिरे एसीएआय इंडस्ट्रियल या कंपनीत कार्यरत होते. त्यांच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट आणि मोजांबिकचा वर्क व्हिसा होता.
कुटुंबीयांनी या प्रकरणात येणाऱ्या अडचणींबाबत लेखी विनंती करून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. विनंती मिळताच गोयल यांनी आपल्या कार्यालयाला तात्काळ परराष्ट्र मंत्रालय (एसईए) आणि मापुटो येथील भारतीय उच्चायोग यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे उर्वरित प्रक्रियेतील टप्पे वेगाने पूर्ण होऊ शकले.
त्यामुळे मापुटो येथील भारतीय उच्चायोगाकडून पार्थिव विमानाने भारतात आणण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आणि सर्व वाणिज्य दूतावासाशी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. यानंतर दि,१८ नोव्हेंबर रोजी एअरपोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन (एपीएचओ) ची मंजुरी मिळाली आणि पार्थिव केनियन एअरलाईन्सद्वारे मोजांबिकहून रवाना होवून ते आज रोजी मुंबई येथे पोहचले.
परराष्ट्र मंत्रालय, मोजांबिकमधील भारतीय मिशन आणि पीयूष गोयल यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही संपूर्ण पुनर्प्रक्रिया अत्यंत जलद पूर्ण झाली असून कुटुंबियांसाठी सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करणे शक्य झाले आहे. परदेशात निधन झाल्याची बातमी मिळाल्यानंतर अत्यंत दुःखात असलेले कुटुंबीय आता आपल्या घरी दिवंगतांचे अंतिम संस्कार विधिवत करू शकणार आहेत.
पीयूष गोयल म्हणाले की, विदेशात अशा दुःखद घटना घडल्यास भारतीय कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. अधिकारी आधीपासूनच या प्रकरणात गुंतले होते आणि त्यांनी परराष्ट्र मंत्रालय व भारतीय मिशनसोबत समन्वय साधून अंतिम प्रक्रिया जलद पूर्ण करण्यात मदत केली, जेणेकरून पार्थिव विलंब न होता मायदेशी परत आणता आले.