मुंबई - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली. त्यात पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले गेले. देशात पाकिस्तानी नागरिकांना शोधून शोधून बाहेर काढले जात आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानी महिला सीमा हैदर अद्यापही भारतात आहे. सीमा हैदर एका ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सचिनच्या संपर्कात आली. त्यानंतर नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे ती भारतात घुसली. आता या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरले आहे.
अबु आझमींनी म्हटलंय की, जर सर्व पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले जात आहे तर सीमा हैदरला मुभा का दिलीय? तिलाही लवकरात लवकर पाकिस्तानात पाठवलं जावं ही आमची मागणी आहे. जर इतर लोकांना व्हिसा रद्द करून पाकिस्तानला परत पाठवले जातंय मग सीमा हैदरला हा नियम का लागू केला नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तसेच सरकारने स्वत: समोर येत या प्रकरणी खुलासा केला पाहिजे. सीमा हैदरला पाकिस्तानला का पाठवले नाही याचे उत्तर दिले पाहिजे. जर कायदा सगळ्यांना एकसमान आहे मग हा अपवाद कशासाठी असं अबु आझमींनी म्हटलं आहे.
कोण आहे सीमा हैदर?
पाकिस्तानची सीमा हैदर ही आपल्या मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे भारतात आली होती. २०२३ मध्ये तिने अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता. फेसबुकवर गेम खेळता खेळता यूपीच्या सचिन मीणा याच्या ती प्रेमात पडली आणि पतीला सोडून ती मुलांसह भारतात आली. भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सीमा हैदरचं काय होणार असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला होता.
सीमा चार पाकिस्तानी मुलांना घेऊन भारतात आली होती. इथे तिने सचिनसोबत संसार थाटला होता. या दोघांना १८ मार्चला मुलगी झाली आहे. या मुलीचे नाव मीरा असे ठेवण्यात आले आहे. सीमासोबत त्याने हिंदू पद्धतीने लग्न केले होते. मीरा ही सीमाची पाचवी तर भारतातील पहिले अपत्य आहे. त्यात पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे, परंतु सीमा पाकिस्तानला जाणार नाही. कारण तिच्यावर इथे खटला सुरु आहे. यामुळे हा नियम तिच्यावर लागू होत नाही असे रबुपुराचे पोलीस उपनिरीक्षक हरेंद्र मलिक यांनी म्हटलं आहे.