भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. रुग्णालय प्रशासनाला धमकी इमेल आला. यानंतर रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक रुग्णालयात दाखल झाले असून शोध मोहीम राबवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाला शुक्रवारी पहाटे हा धमकीचा ईमेल आला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन प्रोटोकॉलचे पालन करून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खबरदारी घेण्यात आली. दरम्यान, बॉम्ब शोधक पथक मुंबई पोलिसांची मोठी तुकडी रुग्णालयात दाखल झाली. अधिकारी ईमेल कुठून आणि कोणी पाठवला, याचा तपास सुरू आहे. लवकरच हा ईमेल पाठवणाऱ्याला ताब्यात घेतले जाईल, अशा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात गस्त वाढवली आहे.