Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल

By दीपक भातुसे | Updated: August 31, 2023 07:00 IST

मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे.

- दीपक भातुसे

मुंबई : भाजपविरोधात एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक आजपासून दोन दिवस (गुरुवार, शुक्रवार) मुंबईत होत आहे. या बैठकीतून केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला जाईल. मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे.

मुंबईत होणाऱ्या बैठकीत प्रामुख्याने जागा वाटपाचा मुद्दा चर्चेला येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा मुकाबला करण्यासाठी जागा वाटपाची रणनीतीही त्याच पद्धतीने आखली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडून येण्याचा निकष ठरवून हे जागा वाटप केले जाणार आहे. मात्र, देशभरातील जागा वाटपाची एकत्रित चर्चा करण्याऐवजी राज्यनिहाय जागा वाटप व्हावे, असा या आघाडीचा प्रयत्न आहे.

प्रत्येक राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, तिथे कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणता पक्ष हमखास निवडून येऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन जागा वाटप करण्याच्या फॉर्म्युल्यावर बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

‘इंडिया’तला २८वा भिडू कोण?बंगळुरू येथील बैठकीत २६ पक्ष एकत्र आले असून, त्यात वाढ होत आहे. या बैठकीत २८ पक्ष एकत्र आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात शेकापचे जयंत पाटील या बैठकीबरोबरच पत्रकार परिषदेतही उपस्थित असल्याने आघाडीत २७ भिडू निश्चित झाले. मात्र २८ वा भिडू कोण, याबाबत नेत्यांना विचारले असता त्यांनी अळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली.

पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण?पंतप्रधान पदाच्या उमेदवारावरून ‘इंडिया’त मतभेद असल्याची चर्चा आहे. मात्र, असे कोणतेही मतभेद ‘इंडिया’त नसून बहुमत मिळाल्यानंतर निवडून आलेले खासदार पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करतील, असे एका नेत्याने सांगितले.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी आज मुंबईत बैठकीसाठी ममता बॅनर्जींपाठोपाठ जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांच्यासुद्धा मुंबईत आगमन झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. त्याचबरोबर अखिलेश यादव, एम. के. स्टेलिन, अरविंद केजरीवाल आदी नेते मुंबईत येणार असल्याची माहिती देण्यात आली.

जागा वाटपाच्या निश्चितीसाठी राज्यनिहाय समिती स्थापन करणारप्रत्येक राज्यात जागा वाटपासाठी एक समिती स्थापन करण्याबाबतही चर्चा होऊ शकते. तिथे ‘इंडिया’तील ज्या पक्षांची ताकद आहे त्यांच्या नेत्यांची राज्यनिहाय समिती स्थापन केली जाऊ शकते. उदाहरण द्यायचे झाले, तर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष ‘इंडिया’ आघाडीत आहेत. या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांची समिती तयार करून त्यांनीच जागा वाटपाबाबत चर्चा करून लवकरात लवकर त्याबाबत निर्णय घ्यावा, असे या मुंबईतील बैठकीत ठरू शकते, असे ‘इंडिया’ती एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अद्याप जागा वाटपावर चर्चा नाही : शरद पवारआम्ही जागा वाटपाची चर्चा अजून सुरू केली नाही. इथून पुढचा आमचा सामूहिक कार्यक्रम काय असावा, याबाबत मुंबईच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर काही लोकांवर जबाबदारी टाकली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. मायावतींबाबत बोलताना ते म्हणाले, मायावतींनी काही वेळा भाजपाशी सुसंवाद केलेला आहे. त्यामुळे त्या कोणासोबत जातील याची स्पष्टता नाही. ‘किमान समान कार्यक्रम’ ठरवून आम्ही पुढे जातोय.

संविधानाचे रक्षण हेच एकमेव उद्दिष्ट : ठाकरेआमची विचारधारा वेगळी असली तरी संविधानाचे रक्षण करणे हा एकमेव उद्दिष्ट आहे.  विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :इंडिया आघाडीमुंबईउद्धव ठाकरेनाना पटोलेशरद पवार