Join us

'INDIA' आघाडीचा लोगो लांबणीवर, जागावाटपही अधांतरित; सर्वपक्षीय सहमतीवर जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 14:17 IST

काँग्रेस आगामी ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेऊन आहे. जेणेकरून या निकालावरून जागावाटपात पक्षाची ताकद वाढवता येईल

मुंबई – विरोधी पक्षांच्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव्ह अलायन्स म्हणजे इंडियाची मुंबईत तिसरी बैठक होत आहे. काल या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीपूर्वी INDIA आघाडीचा लोगो आणि संयोजक नावाची घोषणा होऊ शकते असं बोलले जात होते. परंतु आता इंडिया आघाडीचा लोगो जाहीर होणार नाही. त्यासोबत संयोजकाचेही नाव घोषित होण्याची शक्यता फार कमी असल्याचे बोलले जाते.

इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झालेले बहुतांश पक्ष आधी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवावा अशी मागणी आहे. जागावाटपावर सहमती झाल्यानंतरच लोगो आणि संयोजकाच्या नावावर पुढे जाऊ. इंडिया आघाडीत सहभागी पक्ष काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हणत आहेत. बैठकीत आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना जागावाटपावर जोर दिला होता. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे जागावाटपावर काँग्रेसने पुढाकार घ्यावा असं त्यांची मागणी आहे. परंतु काँग्रेस आगामी ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेऊन आहे. जेणेकरून या निकालावरून जागावाटपात पक्षाची ताकद वाढवता येईल. तर दुसरीकडे आम आदमी पक्षही विस्तार करण्याच्या तयारीत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह ५ राज्यांच्या निवडणुकीवर त्यांचे लक्ष आहे.

समाजवादी पक्षालाही मध्य प्रदेशात काही जागा लढवायच्या आहेत. त्यामुळे हा पक्ष जागावाटपावर जास्त जोर देतोय. त्यामुळे काँग्रेसकडून आजच्या बैठकीत जागावाटपाबाबत काय भूमिका येते हे पाहणे गरजेचे आहे. इंडिया आघाडीच्या लोगोबाबत आघाडीत सहभागी पक्ष हा लोगो आपल्या पक्षाच्या चिन्हासोबत वापरायचा की नाही हे अद्याप ठरवू शकले नाहीत. काही पक्षांच्या मते, निवडणूक काळात इंडिया आघाडीचा लोगो वापरायला हवा. तर काहींच्या मते निवडणुकीत केवळ पक्षाचे चिन्ह वापरायला हवे असं मत आहे.

दरम्यान, सध्या जो लोगो बनवण्यात आला आहे. त्यात आणखी काही सुधारणा करण्याची गरज असल्याने त्यात काही नेत्यांकडून येणाऱ्या सूचनांचाही समावेश असावा. त्यामुळे इंडिया आघाडीचा लोगो आज जारी होण्याची शक्यता नाही. लोगोबाबत सर्व पक्षाशी चर्चा केल्यानंतर, त्यांचे मत घेतल्यानंतर सहमतीनेच अधिकृतपणे इंडिया आघाडीचा लोगो लॉन्च केला जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :इंडिया आघाडीकाँग्रेस