मुंबई : भारत-फ्रान्स यांनी द्विपक्षीय संबंधांना ‘विशेष जागतिक सामरिक भागीदारी’चा दर्जा देत संरक्षण, व्यापार, अत्यावश्यक खनिजे, उच्च तंत्रज्ञान व अक्षय ऊर्जा या क्षेत्रांत सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबईत मंगळवारी द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी वाढत्या भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात भारत-फ्रान्स संबंध ‘जागतिक स्थैर्याची शक्ती’ ठरतील, असे अधोरेखित केले.
मुंबईचा दौरा सुफल; PM मोदी रवाना, भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ, मॅक्रॉन यांची भेट ठरली विशेष
चर्चेनंतर संरक्षण सहकार्यासह एकूण २१ करार व सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व फ्रेंच संरक्षण क्षेत्रातील कंपनी सॅफ्रान यांच्यात ‘हॅमर’ क्षेपणास्त्रांच्या भारतातील उत्पादनासाठी संयुक्त उपक्रमाचा करार समाविष्ट आहे. तसेच भारतीय लष्कर आणि फ्रेंच लँड फोर्सेसमध्ये अधिकाऱ्यांच्या परस्पर नियुक्तीचाही करार करण्यात आला.
कर्नाटकातील वेमगल येथे देशातील पहिली खासगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर असेंब्ली लाइनचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स व एअरबस यांच्या संयुक्त उपक्रमातून एच-१२५ लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरचे उत्पादन इथे होणार असून २०२७ पर्यंत पहिले ‘मेड इन इंडिया’ हेलिकॉप्टर तयार होण्याची अपेक्षा आहे. माउंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणारे जगातील एकमेव हेलिकॉप्टर भारतात तयार होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
जग सध्या अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. फ्रान्सचे कौशल्य व भारताची क्षमता एकत्र आणत आम्ही सहकार्याचा नवा अध्याय सुरू करत आहोत. आमची भागीदारी महासागरांच्या तळापासून ते सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचू शकते.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारत हा फ्रान्सच्या सर्वात विश्वासार्ह भागीदारांपैकी एक आहे. राफेल विमानांपासून पाणबुड्यांपर्यंत संरक्षण सहकार्य सातत्याने विस्तारत आहे. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी आम्ही सहकार्य कायम ठेवू.
इमॅन्युअल मॅक्रॉन, राष्ट्राध्यक्ष, फ्रान्स
प्रगत तंत्रज्ञानावर भर
बैठकीत ‘इंडिया-फ्रान्स इयर ऑफ इनोवेशन २०२६’ची घोषणा करण्यात आली. इंडिया-फ्रान्स इनोवेशन नेटवर्कची स्थापना, जॉइंट ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ग्रुपची निर्मिती, क्रिटिकल मिनरल्स व मेटल्ससाठी संयुक्त उद्देशपत्र, प्रगत पदार्थ संशोधनासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि फ्रान्सच्या सीएनआरएस यांच्यात सहकार्य करार करण्यात आला.
नवी दिल्लीतील एम्समध्ये इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय इन हेल्थ सुरू करणार. इंडो-फ्रेंच सेंटर फॉर मेटाबॉलिक हेल्थ सायन्सेस, एरोनॉटिक्स कौशल्य विकासासाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स व नूतनीकरणीय ऊर्जेसाठी दोन्ही करार. स्टार्टअप व नवोपक्रम परिसंस्थेला चालना देण्यासाठी टी-हब आणि नॉर्थ फ्रान्स यांच्यात सहकार्य करार झाला.
मोदी-मॅक्रॉन यांच्या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि नवोपक्रम या क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी ‘होरायझन २०४७’ रोडमॅप जाहीर करण्यात आला. दोन्ही देशांनी सहकार्य अधिक बळकट करण्याची बांधिलकी व्यक्त केली.
व्यापार, गुंतवणुकीस चालना : दुहेरी कर टाळण्यासाठीच्या करारातील सुधारित कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि शैक्षणिक देवाणघेवाण अधिक सुलभ होईल. आरोग्य क्षेत्रात संसर्गजन्य रोगांवर संशोधनासाठी नवे करार झाले.
Web Summary : India and France deepen ties with 21 agreements, focusing on defense, trade, and technology. Modi and Macron emphasized strengthened cooperation as a force for global stability, paving the way for future collaboration.
Web Summary : भारत और फ्रांस ने रक्षा, व्यापार और प्रौद्योगिकी पर ध्यान केंद्रित करते हुए 21 समझौतों के साथ संबंधों को गहरा किया। मोदी और मैक्रॉन ने वैश्विक स्थिरता के लिए सहयोग को मजबूत करने पर जोर दिया, जिससे भविष्य के सहयोग का मार्ग प्रशस्त हुआ।