मुंबई : एक सामर्थ्यवान सागरी शक्ती म्हणून भारताचा जगात उदय होत असून, विश्वासू आणि जबाबदार जोडीदार म्हणून जग आपल्याकडे पाहत आहे. भारताला विस्तारवाद नव्हे, तर विकासवाद हवा आहे. गेल्या दहा वर्षांत नौदलात ३३ जहाजे आणि सात पाणबुड्यांचा समावेश करण्यात आला असून, भारतीय नौदलाची मान अभिमानाने उंचावली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे काढले. निमित्त होते दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी यांच्या जलावतरणाचे.
आयएनएस सुरत ही विनाशिका, आयएनएस निलगिरी ही युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी यांचे जलावतरण पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या येथील टायगर गेट तळावर झाले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले की, आयएनएस सुरत, निलगिरी आणि वाघशीर यांच्या निर्मितीत ७५ टक्क्यांहून अधिक साहित्य भारतातीलच आहे. एकाचवेळी तीन युद्धनौका आरमारात दाखल करत भारताने आपली आरमारी ताकद जगाला दाखवून दिली आहे. या तीनही युद्धनौका देशाला समर्पित करताना आनंद होत असून सर्व देशवासीयांना शुभेच्छा देतो.
गुन्हेगारी मोडून काढणार समुद्रामध्ये दहशतवाद मानवी तस्करी अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांची तस्करी, असे अनेक प्रकार आढळून येतात.या सर्व गुन्हेगारी कारवायांना आता खीळ घालण्यासाठी आम्ही अधिक सक्षम आणि सज्ज झालो असून, या कारवाया यापुढे अजिबात चालू देणार नाही, असा इशाराही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला.
गुंतवणुकीचा दुप्पट फायदा भारतात शिप बिल्डिंग इकोसीस्टिम तयार होत असल्याने त्याची आर्थिक परिणीतीजाणवत आहे. दीड लाख कोटी रुपये आपण गुंतवले असून तीन लाख कोटींची आर्थिक उलाढालहोणार आहे.यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. आपण साठ मोठी जहाजे भारतात तयार करीत आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.या माध्यमातून भारताची उत्पादनक्षमता आणि सामर्थ्य अधिक मजबूत होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.