Join us

एसटीच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 18:58 IST

एसटीचे कर्मचारी आणि अधिकारी अशा पाच हजार जणांना एसटी महामंडळाने महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रतिदिन ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

 

मुंबई : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक एसटी बसने सुरू आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका पत्करून काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील एसटीचे कर्मचारी आणि अधिकारी अशा पाच हजार जणांना एसटी महामंडळाने महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रतिदिन ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी एसटी महामंडळाने परिपत्रक काढत अत्यावश्यक सेवेतील एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना  वेतनासह प्रोत्साहन भत्ता अंदाज करण्याचे निर्देश एसटी सर्व विभागीय कार्यालयाला देण्यात आले आहेत.  

लॉकडाऊन काळात रेल्वे सेवेसह इतर सर्व वाहतूक सेवा बंद आहेत. कोरोना विषाणूविरोधात लढाईत वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर, परिचारिका महापालिका, पोलीस, बँक, महाराष्ट्र शासन व इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत आहेत. या सर्व अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या जिल्हयातून कर्तव्यावर येण्यासाठी व त्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने एसटी बस अत्यावश्यक सेवा म्हणून चालविण्यात येत आहे. या अत्यावश्यक सेवेत काम करणारे चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, कार्यशाळा कर्मचारी व अधिकारी जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना, इतर विभागातून मदतीसाठी आलेल्या व प्रत्यक्ष कामगिरी बजावत असलेल्या  कर्मचाऱ्यांना ३०० रूपये विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. मात्र एसटी महामंडळाकडून या संबंधित परिपत्रक काढण्यात आले नव्हते. मात्र गुरुवारी  एसटी महामंडळाने परिपत्रक काढत एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबरोबरच  प्रोत्साहन भत्ता अंदाज करण्याचे निर्देश एसटी सर्व विभागीय कार्यालयाला दिले आहेत. २३ मार्च २०२० पासून ते अत्यावश्यक सेवा सुरू असेपर्यंत कर्तव्य बजावणाऱ्या पाच हजार एसटी कर्मचाऱ्यांना हा विशेष प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहेत.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस