एकनाथ शिंदेंच्या हस्ते रविवारी दिंडोशीत योगालय अन् बाल संस्कार केंद्राचा लोकार्पण सोहळा
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 27, 2023 14:33 IST2023-01-27T14:33:02+5:302023-01-27T14:33:13+5:30
खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आगमन होणार असल्यामुळे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या हस्ते रविवारी दिंडोशीत योगालय अन् बाल संस्कार केंद्राचा लोकार्पण सोहळा
मुंबई: महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, दिंडोशी, ओबेरॉय मॉल समोर मालाड (पूर्व) याठिकाणी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून सुसज्ज योगालय व बाल संस्कार केंद्र उभारण्यात आले आहे. सदर वास्तुचा लोकार्पण सोहळा रविवार दि, २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आगमन होणार असल्यामुळे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. कलावती आईंच्या साधकांना योगसाधना व बालसंगोपना करण्यासाठी श्री सिद्धकला विश्वस्त मंडळ गोरेगाव यांना सदर योगालय संचालित करण्यासाठी हस्तांतरीत केले असून मुंबई शहरातील हजारो साधकांना या वास्तुचा लाभ होणार आहे.
याप्रसंगी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम, शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसुळ, मागाठाणेचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे, माजी आमदार कॅप्टन.अभिजीत अडसुळ, शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.