त्यांचे मुंबईवरचे बेगडी प्रेम अखेर उघड झाले
विधान परिषदेत सकाळी विशेष सत्रात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धवसेनेचे आ. अनिल परब, आ. सुनील शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांमुळे प्रकल्प बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याबाबतची चर्चा उपस्थित केली होती. मात्र, प्रश्नकर्ते आमदारच अनुपस्थित होते. ही संधी साधत मंत्री उदय सामंतांनी चर्चा लावून सभागृहात उपस्थित न राहणाऱ्या सदस्यांचा प्रश्न लॅप्स करण्याची मागणी केली. मंत्र्यांना येण्यास दोन चार मिनिटे उशीर झाल्यास गोंधळ घालणारे सदस्य गेले कुठे? महत्त्वाची चर्चा असताना ते उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे त्यांचे मुंबईवर बेगडी प्रेम आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांना मंत्री जयकुमार रावल यांनीही दुजोरा दिला.
एबी फॉर्म घेऊन सोबत आहोत
विधानसभेत विशेष जनसुरक्षा विधेयकावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान माकपचे एकमेव आमदार विनोद निकोले यांनी या विधेयकाला विरोध केला. हा विरोध करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा संविधान मानणारा पक्ष आहे. संविधानाने दिलेला सरकारविरोधातील आंदोलनाचा अधिकार या कायद्याने हिरावून घेतला जाईल, अशी भीती निकोले यांनी व्यक्त केली. हाच धागा पकडून विधेयकावर बोलताना सुधीर मुनगंटीवार निकोले यांना म्हणाले, भीती बाळगू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अगदी एबी फॉर्म घेऊन सोबत आहोत. मुनगंटीवार असे बोलताच विधानसभेत सगळे हसायला लागले.