Join us  

राज्यात CNG 5 रुपयांनी स्वस्त, पण पाच दिवसांत ३.२० रुपयांनी वाढले पेट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 9:26 AM

राज्य सरकारने व्हॅट घटविला, १ एप्रिलपासून नवे दर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सीएनजीवरील व्हॅट १३.५ टक्क्यांवरून केवळ ३ टक्के करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केल्याने सीएनजी किलोमागे किमान पाच रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने सहा महिन्यांत सीएनजीचे दर ११.४३ रुपयांनी वाढविले असताना राज्याने सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा दिला.  आहे. व्हॅट कपात १ एप्रिलपासून लागू होणार आहे.

उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी ११ मार्चला राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडताना सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. त्याची अधिसूचना शुक्रवारी काढली. पर्यावरणपूरक असलेल्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा (सीएनजी) मुंबईतील दर सध्या किलोमागे ६६ रुपये इतका आहे. त्यात सीमा शुल्क, व्हॅट व वितरकाच्या कमिशनचा समावेश असतो. मूळ किंमत किलोमागे ५२ रुपये इतकी आहे. त्यावर, सीमा शुल्क २.७५ टक्के, त्यानंतर येणाऱ्या किमतीवर १३.५ टक्के व्हॅट या दोघांच्या बेरजेवरील किमतीवर जवळपास २.५० रुपये वितरकाच्या कमिशनचा समावेश असतो. आता व्हॅटमध्ये १०.५० टक्के कपात झाली आहे. ती अर्थातच मूळ किमतीवर असेल. मुंबईत एका सीएनजी वाहनासाठी दररोज सरासरी चार किलो सीएनजीचा वापर केला जातो. राज्य सरकारने केलेल्या व्हॅट कपातीमुळे एका वाहनधारकाची सरासरी २० रुपये बचत झाली आहे.

इंधनदरवाढ थांबेना !

पाच दिवसांत ३.२० रुपयांनी दर वाढले

लाेकमत न्यूज नेटवर्क  ।  नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्राेल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्राेल आणि डिझेलचे दर लिटरमागे प्रत्येकी ८० पैशांनी वाढविले. राज्य सरकारच्या व्हॅटमुळे प्रभावी दरवाढ ही ८० पैशांपेक्षा जास्त आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये इंधनाचे दर ३ रुपये २० पैशांहून अधिक वाढले. आठवडाभरात पेट्राेल, डिझेलसह घरगुती गॅस, सीएनजी आणि पीएनजीचेही दर वाढविण्यात आले. त्यामुळे संपूर्ण आठवडाच सर्वसामान्यांसाठी महागाईचा ठरला आहे. 

टॅग्स :पेट्रोलमहाराष्ट्रअजित पवार