Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवधर्माच्या नावाने भामटे खाताहेत मेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:18 IST

नागरिकांच्या श्रद्धेचा आणि देवावर असलेल्या भक्तीचा फायदा उचलत फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत मुंबईत वाढत आहेत.

मुंबई 

नागरिकांच्या श्रद्धेचा आणि देवावर असलेल्या भक्तीचा फायदा उचलत फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत मुंबईत वाढत आहेत. गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस व्यस्त असल्याने भामटे अशा प्रकारे फसवणूक करत असल्याचे दिसत आहे. तेव्हा नागरिकांनीही याबाबत सतर्क राहावे आणि अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून केले जात आहे. 

फसवणुकीच्या घटना : २४ सप्टेंबर, २०२३जैन मंदिरात दानधर्म...  बोरिवली पश्चिमेच्या गांजावाला लेन परिसरात दोन अनोळखी पुरुषांनी जैन मंदिरात पैसे दान द्यायचे आहेत, त्यासाठी नोटांना सोन्याचा स्पर्श करायचा आहे, असे सांगत हंसा जैन (७२) या माजी शिक्षिकेला गंडा घातला.   भामट्यांनी जैन यांच्या हातातील लाख रुपयांच्या पाटल्या काढायला लावत त्यात नोटा गुंडाळल्यासारखे करून त्या पिशवीत ठेवल्या. पिशवी जैन यांना दिली आणि अर्धा तासाने ती उघडा असे सांगितले.  मात्र, जेव्हा जैन यांनी ती पिशवी उघडली तेव्हा त्यामध्ये ठेवलेल्या पाटल्या गायब होत्या आणि ते भामटेही तिथून पसार झाले. विरोधात बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२२ सप्टेंबर, २०२३ साईबाबांचा मिळेल आशीर्वाद!वांद्रे पूर्व परिसरात हेल्मेटचे दुकान चालवणाऱ्या रामचंद्र रेड्डी (६२) यांना एका भामट्याने साईबाबा मंदिरात अकराशे रुपयांचे अन्नदान करायचे असून, आपली ओळख आहे का, असे रेड्डी यांना विचारले. तसेच तुम्ही माझ्यातर्फे मंदिरात पैसे द्या, असे म्हणत प्लास्टीकच्या पिशवीत फुले टाकून ती रेड्डींना दिली. पैशासोबत सोन्याच्या दोन वस्तू ठेवल्यास साईबाबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, असेही तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवत रेड्डी यांनी सोन्याची अंगठी आणि चेन मिळून १ लाख ६० हजार ५०० रुपयांचे दागिने त्याच्यासमोर पिशवीत ठेवले. ते दागिने लंपास करून त्याने पळ काढला. 

टॅग्स :सोनंमुंबई