Join us
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणीपुरवठ्यात घट; दहा वर्षांच्या तुलनेत प्रमाण कमी, ०.४६ टक्के नमुने दूषित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 09:40 IST

स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत मुंबई अव्वल मानली जाते. दोन वर्षांपूर्वी ०.३३ टक्के पाण्याचे नमुने हे दूषित असल्याचे आढळून आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत मुंबई अव्वल मानली जाते. दोन वर्षांपूर्वी ०.३३ टक्के पाण्याचे नमुने हे दूषित असल्याचे आढळून आले होते. त्याआधीच्या वर्षात हे प्रमाण ०.९९ टक्के होते. आता हे प्रमाण ०.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या आठ ते दहा वर्षाच्या तुलनेत सध्या दूषित पाण्याचे प्रमाण हे कमी झाले आहे. 

मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत होणाऱ्या पाणीपुरवठ्याची, जलाशयांमधील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी पालिकेच्या विश्लेषक प्रयोगशाळेत केली जाते. त्यानुसार वर्षभरात घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यातील निष्कर्ष समोर आला आहे. मागील वर्षभरात दूषित पाण्याचे प्रमाण हे ०.४६ टक्के असल्याचे आढळले आहे.

‘ए’ वॉर्डात दूषित पाणी २.१ टक्के-

मालाड पी-उत्तर विभागात दूषित पाण्याचा एकही नमुना आढळलेला नाही. भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, वडाळा आणि सायन भागामध्ये ०.०१ टक्के, अंधेरी पश्चिम, कांदिवली, ग्रॅन्टरोड आणि  गिरगाव भागातील दूषित पाण्याचे प्रमाण ०.०२ टक्के आहे. सर्वाधिक दूषित पाण्याचे प्रमाण ‘ए’ वॉर्डात आहे. या वॉर्डात हे प्रमाण २.१ टक्के आहे. त्यानंतर अंधेरी पूर्व भागात १.७ टक्के, माहीम -दादर भागात  १.२ टक्के एवढे पाण्याचे नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विकासकामे करताना फुटतात जलवाहिन्या-

एप्रिल २०२२-२३ ते मार्च २०२३-२४ या कालावधीतील दूषित पाण्याच्या नमुन्यांचा विभागवार आढावा घेतला, तर गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षातील दूषित पाण्याच्या नमुन्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे. अनेक वस्त्यांमध्ये मुख्य जलवाहिनीतून दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण फारच अल्प आहे. काही ठिकाणी विकासकामे सुरू असताना जलवाहिन्या फुटतात. पाणीचोरीसाठी काही समाजकंटक जलवाहिनीला छिद्र पाडतात त्यातून बाहेरची घाण जलवाहिनीत  शिरते आणि पाणी दूषित होते, असे पालिका जलअभियंत्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकापाणी