Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला हवीय का पोस्टाची फ्रेंचायझी? मग त्वरित करा अर्ज; सर्वसामान्यांना संधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 10:46 IST

आता सर्वसामान्यांनाही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आऊटलेट्स उभारण्याची संधी मिळणार आहे.

मुंबई : मागील काही वर्षांत पोस्टानेही काळानुरूप कात टाकल्यामुळे ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यात विभागाला यश मिळाले आहे. त्यासह एका बाजूला बँकांच्या गुंतवणुकीबाबत सामान्य साशंक असताना पोस्टानेही गुंतवणुकीस, विविध योजना आणल्यानेही पोस्टाला फायदा झाला. ग्राहकांकडून आता आणखी टपाल कार्यालये उघडण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांनाही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आऊटलेट्स उभारण्याची संधी मिळणार आहे.

फ्रँचायझी आउटलेटद्वारे या सेवांचा लाभ?

अंतर्देशीय स्पीड पोस्टचे बुकिंग नॉन-सीओडी (कागदपत्रे आणि पार्सल), अंतर्देशीय रजिस्टर पत्रे, ई मनी ऑर्डर, टपाल तिकीट आणि लेखनसाहित्याची विक्री,  रेव्हेन्यू स्टॅम्पची विक्री, केंद्रीय भरती शुल्क स्टॅम्प इ.सह किरकोळ सेवा,  पोस्टल जीवन विमा उत्पादनांसाठी थेट एजंट म्हणून कार्य करणे आणि प्रीमियम संकलनासह संबंधित विक्रीपश्चात  सेवा प्रदान करणे.

फ्रँचायझीसाठी काय आहे पात्रता?

इंडिया पोस्ट नवीन फ्रँचायझी योजना १ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत आहे. फ्रँचायझीसाठी संस्था/संघटना/इतर संस्था, पानवाला, किराणावाला, छोटे दुकानदार अर्ज करू शकतात. 

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक :-

वय १८ वर्षांपेक्षा जास्त हवे. पोस्ट विभाग व्यक्ती आणि संस्था यांच्यासोबत करार करेल. याकरिता मान्यताप्राप्त शाळेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्थानिक भाषा आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेली; संगणक साक्षर; स्मार्ट फोन वापराबाबत परिचित; वैध पॅन क्रमांक असलेली व्यक्ती फ्रँचायझी होण्यासाठी अर्ज करू शकते. अर्जदाराला टपाल कार्यालयात सुरक्षा ठेव म्हणून दहा हजार रुपये जमा करावे लागतील.

असा मिळणार फ्रँचायझीचा लाभ :-

 फ्रँचायझींना प्रत्येक रजिस्टर पत्रासाठी ३ रु.,  २००/- पेक्षा जास्त मूल्याच्या प्रत्येक मनी ऑर्डरसाठी ५ रुपये, टपाल तिकीट आणि लेखनसाहित्य विक्रीवर ५ टक्के कमिशन मिळेल. बुक केलेल्या स्पीड पोस्ट लेखासाठी कमिशन दर अतिशय आकर्षक आहे आणि फ्रँचायझी त्याने केलेल्या मासिक व्यवसायाच्या ७ टक्के ते २५ टक्के कमिशन मिळेल.

टॅग्स :मुंबईपोस्ट ऑफिस