Join us

राज्यात १२० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक; रिक्त पदे भरण्यासाठी प्राध्यापक संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 10:40 IST

उच्च शिक्षण संस्थांमध्ये ३६ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असणे अपेक्षित आहे, मात्र महाराष्ट्रात १२० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक आहे.

मुंबई : उच्च शिक्षण संस्थांमध्ये ३६ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असणे अपेक्षित आहे, मात्र महाराष्ट्रात १२० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक आहे. त्यातून शैक्षणिक गुणवत्ता ढासळत आहे. राज्यात शासकीय आणि अनुदानित कॉलेजांमध्ये प्राध्यापकांची ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. ती भरा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्राध्यापक संघटनांनी सोमवारी दिला.

युजीसीच्या नियमाप्रमाणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी ९० टक्के जागा नियमित पद्धतीने भरण्याचे बंधन घातले असताना राज्यात त्याला सर्रास हरताळ फासला जात आहे. तसेच गुणवत्ताधारक तरुणांची तासिका तत्वावर नेमणूक करुन त्यांचे शोषण केले जात आहे, असा आरोप प्राध्यापक संघटनांनी केला आहे. तसेच राज्याचे उच्च शिक्षणमंत्री, सचिव आणि उच्च शिक्षण संचालक यांना बडतर्फ करण्याची मागणीही संघटना राज्यपालांकडे करणार आहेत. प्राध्यापकांच्या संघटनांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ, एसएनडीटी विद्यापीठ शिक्षक संघटना आणि मुंबई विद्यापीठ शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्राध्यापक की वेठबिगार?

१) राज्यातील काही कॉलेजांमध्ये ७० टक्के प्राध्यापक तासिका तत्वावर आहेत. तर बहुतांश कॉलेजांमध्ये ५० टक्के प्राध्यापक तासिका तत्वावरील आहेत. 

२) त्यांना वेठबिगाराप्रमाणे राबविले जात आहे. त्यातून प्राध्यापक या पेशाचे अवमुल्यन होत आहे, अशी खंत मुंबई विद्यापीठ शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

१६ ऑगस्टपासून मोर्चे -

१) येत्या १४ ऑगस्टपर्यंत प्राध्यापक पदासाठी गुणवत्ताधारक तरुण-तरुणींचे विद्यापीठस्तरावर मेळावे घेतले जाणार आहेत. 

२) १६ ऑगस्टपासून विद्यापीठांवर मोर्चे काढले जाणार आहेत. तसेच राज्यातील मंत्र्यांच्या जिल्हापातळीवर आयोजित कार्यक्रमांच्या ठिकाणी निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. एस. पी. लवांडे यांनी दिली.

भरती थांबविल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार-

राज्यभरातील शासकीय आणि अनुदानित कॉलेजांमध्ये प्राध्यापकांची भरती थांबविल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी संघटनांनी दिला.

टॅग्स :मुंबईशिक्षक