Join us

शहराला पाणीपुरवठा करताना पालिकेची दमछाक; गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 10:59 IST

सन २०४१ पर्यंत मुंबईची अंदाजित लोकसंख्या १ कोटी ७२ लाख आणि पाण्याची मागणी दररोज ६,५३५ दशलक्ष लीटर्स असे प्रमाण असणार आहे.

मुंबई - मुंबईची लोकसंख्या आणि रोजच्या पाण्याची मागणी पाहता मुंबईकरांना पाणीपुरवठा करताना मुंबई महापालिकेच्या तोंडचे अक्षरशः पाणी पळाल्याचे समोर आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत दिसत असून गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा पिंजाळ हे नदी जोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी होऊ शकते. त्यामुळे पुरेसे पाणी मिळण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

सन २०४१ पर्यंत मुंबईची अंदाजित लोकसंख्या १ कोटी ७२ लाख आणि पाण्याची मागणी दररोज ६,५३५ दशलक्ष लीटर्स असे प्रमाण असणार आहे. हे लक्षात घेतले तर मुंबईकरांच्या पाण्याची गरज उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. पाण्याची ही वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे नदीजोड प्रकल्प हाती घेतले असून ते पूर्णत्वास गेल्यानंतर पाणीपुरवठ्यात प्रतिदिनी २,८९१ दशलक्ष लिटर्स इतकी वाढ होणे अपेक्षित आहे.

६०० दशलक्ष लिटर पाण्याची तूटसात जलस्रोतांद्वारे मुंबईकरांना रोज ४००० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईची सध्याची पाण्याची रोजची मागणी ४६६४ दशलक्ष लिटर एवढी आहे; परंतु पाणी गळती, जुन्या जलवाहिन्या, पाणी चोरी आदी कारणांमुळे सुमारे ६०० दशलक्ष लिटर एवढी तूट जाणवत असल्याचे चित्र आहे.

असे येते मुंबईत पाणी जलस्रोतांमधील पाणी जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत वाहून आणण्याचे काम २२३५ मि.मी. ते ३००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे व ५५०० मि.मी. व्यासाच्या काँक्रिटच्या भूमिगत जलबोगद्याच्या माध्यमातून होते. यातून ५० टक्के पाणी हे उदंचन व्यवस्थेद्वारे जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत आणले जाते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणी कपात