Join us

मुंबईत 'माझा लाडका खड्डा' आंदोलन, वॉचडॉग फाऊंडेशनने पालिकेचे वेधले लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 17:36 IST

मुंबईतील खड्ड्यांकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाउंडेशनने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

मुंबई : मुंबईतील खड्ड्यांकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाउंडेशनने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. ‘माझा लाडका खड्डा’ टी शर्ट परिधान करून के पूर्व वॉर्डमधील सहार गाव, विलेपार्ले पूर्व येथे रोड क्रमांक १ आणि २ जंक्शनवर निदर्शने करण्यात आली.

वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त ॲड. गॉडफ्रे पिमेंटा, निकोलस अल्मेडा, सदस्य ब्रायन परेरा, जोनाथन फर्नाडिस, ब्लेझ मोरेस, आर्थर मिरांडा, विद्यार्थी व रहिवाशांनी आंदोलनात सहभाग घेतला. वॉचडॉग फाउंडेशनने मुंबईतील खड्ड्यांची झालेली चाळण आणि खड्डेमय स्थिती महापालिकेकडे मांडली असल्याचे पिमेंटा यांनी सांगितले. फाउंडेशनच्या सदस्यांनी खड्डेदेखील सिमेंट काँक्रिटने बुजवले.

अलिकडे राज्य सरकारने 'माझी लाडकी बहिण योजना' आणि त्यानंतर ' माझा लाडका भाऊ योजने'ची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाउंडेशनने  ‘माझा लाडका खड्डा’ असे टी-शर्ट परिधान करून प्रशासनाविरोधात आंदोलन केले. 

कोट्यवधींचा खर्च -

१) मुंबईतील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पहिल्या पावसातच खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. गेल्या काही दिवसांत जोरदार पडलेल्या पावसामुळे खड्डे पडले असून, पालिकेकडे वॉर्डस्तरावर खड्ड्यांविषयी तक्रारी केल्या जात आहेत. 

२) १ जून ते १६ जुलैपर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त खड्डे पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पालिकेकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले, तरी ते वेळेत बुजवले जात नसल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाखड्डे