लाडाची गौराई आली, रेडिमेड फेटेवाली! दागिने, मुखवटे, फुलांनी, बाजार सजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 11:09 IST2024-09-07T10:52:08+5:302024-09-07T11:09:18+5:30
लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर गौरीचेही आनंदाने स्वागत करण्यात येते. लेक माहेरी आल्यावर तिचे जसे कोडकौतुक केले जाते.

लाडाची गौराई आली, रेडिमेड फेटेवाली! दागिने, मुखवटे, फुलांनी, बाजार सजला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर गौरीचेही आनंदाने स्वागत करण्यात येते. लेक माहेरी आल्यावर तिचे जसे कोडकौतुक केले जाते, तसेच गौराईलाही छान साड्या, दागदागिने आणि आवडीच्या विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवत तिची सेवा केली जाते. मात्र, यंदा तिला रेडिमेड फेटा घालण्याचा ट्रेंड आहे.
गौराईचे सुंदर मुखवटे-
बाजारात फायबर, पीओपी आणि कापडी गौरीचे मुखवटे लहान-मोठ्या आकारात ३०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. जवळपास साडेतीन फूट उंचीच्या गौरी बाजारात उपलब्ध आहेत. हे मुखवटे मॅट आणि ग्लॉसी फिनिश व सुंदर पाणीदार डोळ्यांचे आहेत. त्यात दागिने परिधान केलेली आणि विना दागिने मात्र आपण दागिने घालू शकू, अशी सोय असलेले पर्यायही उपलब्ध आहेत.
दागिन्यांची मागणी-
गौरीला दागिन्यांमध्ये सोनपट्टी, कंबरपट्टा, कंठी, मुकुट, खोपे, चिंचपेटी, नथ, टेम्पल ज्वेलरी, असे पर्याय आहेत. त्यातच मॅचिंग ज्वेलरी आणि त्याचे परवडण्यासारखे सेटही विक्रीसाठी ठेवले आहेत. त्यामुळे तुम्हाला गौरीचा हवा तसा साजशृंगार करता येईल. साडीसोबत मॅचिंग फेटाही परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्हाला मिळू शकतो.
घाऊक बाजारात गौरी-गणपतीसाठी दागिने स्वस्तात उपलब्ध आहेत. किरकोळ विक्रेतेही परवडणाऱ्या किमतीतच या ज्वेलरीची विक्री करत आहेत.- सोहन माली, इमिटेशन ज्वेलरी व्यापारी
नैवेद्य मागवा ऑनलाइन-
गौरीला नैवेद्य दाखवायला उपमा, कैरीची डाळ, पन्ह, ओल्या नारळाची करंजी, पाटवड्या, सात कप्प्याचे घावन, भाकरी आणि शेगलाची भाजी, साजूक तूप भात, ज्वारी आंबील, शेंगाची आमटी, पापड कुरडई, आणि विडा, असे पदार्थ घरपोच मिळण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर देता येते.