Join us

वांद्रे परिसरामध्ये उद्या ठणठणाट; जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शटडाउन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 09:14 IST

वांद्रे पश्चिम (एच-पश्चिम) विभागात शुक्रवार, ३० ऑगस्टला जलवाहिनी दुरुस्ती आणि जोडणीचे काम केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे पश्चिम (एच-पश्चिम) विभागात शुक्रवार, ३० ऑगस्टला जलवाहिनी दुरुस्ती आणि जोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ ची जुनी, जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. तसेच, वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक ३२ दरम्यान नव्याने टाकलेली ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे  ३० ऑगस्टला सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेदरम्यान केली जाणार आहेत. या कामांमुळे एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत जीर्ण जलवाहिनी बदलणे, नवीन मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करणे आदी कामे केली जाणार आहेत.  या कामानंतर पाली हिल जलाशयाची पातळी सुधारणार आहे. एकंदरीतच एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे. 

...येथे पाणी नाही

१) वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १० ते दुपारी २) पाणीपुरवठा बंद राहील.

२) खार दांडा परिक्षेत्र -खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ५:३०  ते रात्री ८:३०) पाणीपुरवठा बंद राहील.

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - रात्री ९ ते मध्यरात्री १२) पाणीपुरवठा बंद राहील.

४) नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठाकरावा. पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकापाणी