तब्बल १,२०० हातगाड्या, १,८३९ सिलिंडर उचलले! अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 10:24 IST2024-07-06T10:21:09+5:302024-07-06T10:24:09+5:30
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे.

तब्बल १,२०० हातगाड्या, १,८३९ सिलिंडर उचलले! अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत कारवाई
मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत गेल्या १७ दिवसांत विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. यात फेरीवाल्यांकडून सुमारे ५ हजार ४३५ साधनसामग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात १ हजार १८६ चार चाकी हातगाड्या, १ हजार ८३९ घरगुती गॅस सिलिंडर आणि २ हजार ४१० इतर विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू आहे. मुंबईतील विविध विभागांमध्ये १८ जून ते ४ जुलैपर्यंत झालेल्या कारवाईत चार चाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेने दिली.
१) जप्त साधनांची एकूण संख्या- ५,४३५
२) चार चाकी हातगाड्या- १,१८६
३) सिलिंडर- १,८३९
४) स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडी इत्यादी विविध प्रकारचे साहित्य- २,४१०