Join us

 ...तर पोलिसांवरही कारवाई; वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 10:16 IST

वाहतुकीच्या  नियमांचे उल्लंघन केल्यावर पोलिसांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

मुंबई : वाहतुकीच्या  नियमांचे उल्लंघन केल्यावर पोलिसांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. कर्तव्य बजावतानादेखील त्यांनाही कायद्याची बंधने आहेत, हे कारवायांवरून सिद्ध झाले आहे. 

वाहन चालवताना बऱ्याच वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलीस दंड भरायला सांगतात. आपण दंड भरून पुन्हा आपल्या प्रवासाला लागतो; मात्र अनेकदा काही वाहतूक पोलीस गाडी थांबवल्यावर आधी गाडीची चावी काढून घेतात किंवा गाडीच्या टायरमधली हवा काढतात. खरंतर या दोन्ही गोष्टी कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. 

‘हे’ कायद्याच्या कक्षेत नाही-

मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत काही नियम बनवले गेले आहेत. या नियमात असिस्टंट सब इन्स्पेक्टर वाहतुकीचे नियम मोडल्याने तुमच्याकडून दंड वसूल करू शकतो. कोणाच्याही गाडीच्या चाव्या काढणे किंवा टायर मधली हवा काढणे हे या कायद्याच्या कक्षेत येत नाही. 

३३ लाख ३१ हजारांचा दंड-

१) गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. यामध्ये हॉर्न आणि बदल केलेल्या सायलेन्सर रडारवर आहे.  

२) मुंबई वाहतूक विभागाने २१ मे ते ११ जूनदरम्यान विशेष मोहीम राबवून ११ हजार ६३६ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत बदल केलेले २००५ सायलेन्सर व कर्णकर्कश आवाज करणारे एकूण ८ हजार २६८ प्रेशर हॉर्न जप्त केले. 

३) संबंधितांवर ३३ लाख ३१ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. नुकतेच वरळी पोलीस मैदानावर जप्त केलेले सायलेन्सर आणि हॉर्न पोलिसांनी नष्ट केले आहेत.

विनाहेल्मेट पोलीस दिसल्यास फोटो करा शेअर -

वाहतूक पोलीस त्रास देत असल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. अनेकदा वाहतूक पोलीस विनाहेल्मेट दिसल्यास नागरिकांकडून त्यांच्याही वाहनाचे फोटो एक्सवरून शेअर  करण्यात येते. त्यानुसार त्यांच्यावरही पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस