मध्य रेल्वेची लोकल फेऱ्यांत २५ वर्षांत ७५ टक्के भरारी! प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुधारण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:07 IST2024-09-14T10:56:59+5:302024-09-14T11:07:49+5:30
मध्य रेल्वेने गेल्या २५ वर्षांत लोकल सेवांमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

मध्य रेल्वेची लोकल फेऱ्यांत २५ वर्षांत ७५ टक्के भरारी! प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुधारण्यावर भर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेने गेल्या २५ वर्षांत लोकल सेवांमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ केली आहे. १९९८-९९ मध्य रेल्वेवर दररोज १,०७७ लोकल फेऱ्या चालवल्या जात होत्या. आता ही संख्या १,८१० फेऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. या सेवांमध्ये वाढ करताना अपुऱ्या जागेमुळे नवीन पायाभूत सुविधांचा विकास करताना रेल्वेला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. असे असले तरी अपुऱ्या पायाभूत सुविधांमध्येही प्रवाशांसाठी सेवा पुरविण्याचा आलेख हा नेहमीच मध्य रेल्वेने चढता ठेवला आहे.
मध्य रेल्वेकडे सध्या एकूण १७० लोकल गाड्या असून, त्यापैकी १३८ गाड्या दररोज सेवा पुरवतात. या गाड्यांमध्ये १५ डब्यांच्या २ साध्या आणि १२ डब्यांच्या ६ एसी लोकल आहेत. इतर वाहतूक साधनांच्या तुलनेत रेल्वे ही सर्वांत स्वस्त आणि वेगवान असल्याने मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वेने आपल्या फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुधारण्यावर भर दिला आहे.
११ पैसे ते १.२५ रुपये प्रति किमी खर्च -
१) मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार मध्य रेल्वे ही सर्वांत स्वस्त वाहतूक प्रणाली आहे.
२) एकावेळचे सिंगलजर्नी तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना द्वितीय श्रेणीसाठी प्रति किमी ११ पैसे, प्रथम श्रेणीसाठी १.२५ रुपये प्रति किमी आणि एसी लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति किमी १.४० रुपये मोजावे लागतात.
३) दाट उपनगरी रेल्वे नेटवर्कमधील गाड्या सरासरी ४५ किमी प्रतितास वेगाने धावतात. त्यामुळे रेल्वे ही सर्वांत स्वस्त आणि जलद सेवा देते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या काळात मुंबई उपनगरी प्रणालीची क्षमता वाढविण्यासाठी गुंतवणूक सुरू आहे.
भविष्यात आणखी सुधारणा करण्याची योजना-
आता मुंबई आणि परिसरातील प्रवाशांना अधिक सुलभ आणि सोयीस्कर प्रवास करणे शक्य होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, भविष्यात आणखी सुधारणा करण्याची योजना आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक सुविधा आणि सेवा देता येतील.