अक्सा बीचच्या पदपथाला पडले भले मोठे भगदाड; ‘मेरीटाइम’चा २० कोटींचा खर्च पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 12:03 IST2024-07-12T12:01:52+5:302024-07-12T12:03:10+5:30
अक्सा बीच येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तब्बल २० कोटी खर्च करून बांधलेल्या पदपथाची आणि संरक्षक भिंतीची पडझड झाली.

अक्सा बीचच्या पदपथाला पडले भले मोठे भगदाड; ‘मेरीटाइम’चा २० कोटींचा खर्च पाण्यात
मुंबई : अक्सा बीच येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तब्बल २० कोटी खर्च करून बांधलेल्या पदपथाची आणि संरक्षक भिंतीची पडझड झाली. याप्रकरणी संबंधितांवर उत्तरदायित्व निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने केली आहे.
किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अक्सा बीच येथे कोबाल्ट दगडापासून एक किलोमीटर लांबीची भिंत बांधण्यात आली. त्यासोबतच पदपथही बांधण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पदपथ आणि भिंतीची दुर्दशा झाली आहे. भिंत बांधताना पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता.
सीआरझेड-१ क्षेत्रात भिंत बंधू नका, अशी त्यांची मागणी होती. या पावसाळ्यात येथील पदपथ खचला आहे. त्यामुळे रत्यावरून चालणे धोकादायक झाले आहे. निष्काळजीपणा आणि खराब व्यवस्थापनामुळे पायाभूत सुविधांची दुर्दशा होत आहे. त्यामुळे करदात्यांचा पैसे पाण्यात जात आहे. पायाभूत सुविधांच्या दुर्दशेमुळे सुरक्षेचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. या प्रकरणाचे लेखापरीक्षण व मूल्यांकन करावे आणि दुर्दशा का झाली, त्यास कोण जबाबदार आहे, हे निश्चित करा, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.