Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गरवारे'मध्ये दि.वि. गोखले जयंती साजरी, वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 13:42 IST

Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने रविवार २४ मार्च रोजी मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले दिवंगत पत्रकार  दि. वि. गोखले यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वार्षिक पुरस्कार वितरण आणि वर्गाच्या 'गरवारे दर्पण' या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने रविवार २४ मार्च रोजी मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले दिवंगत पत्रकार  दि. वि. गोखले यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वार्षिक पुरस्कार वितरण आणि वर्गाच्या 'गरवारे दर्पण' या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच 'युद्ध पत्रकार कसे व्हाल?' या विषयावर  मुक्त पत्रकार आणि युद्धवार्ता अभ्यासक मल्हार गोखले यांचे व्याख्यान झाले. 

या व्याख्यानामध्ये मल्हार गोखले यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या युद्धांची पार्श्वभूमी आणि इतिहास मोठ्या रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगत युद्ध पत्रकारिता वार्तांकनाचे धडे दिले. यावेळी संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. त्यामध्ये पत्रकारिता वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला वर्गाचा माजी विद्यार्थी सुजित शिर्के याला यावर्षीचा दि. वि. गोखले  पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर वर्गाच्या माजी  विद्यार्थिनी  रेश्मा साळुंखे यांना विद्याधर गोखले पुरस्कार तर  बाळकृष्ण परब यांना डॉ. अरुण टिकेकर पुरस्कार  प्रमुख पाहुणे मल्हार गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

तसेच अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत आणि गरवारे व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण देखील या कार्यक्रमात झाले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नंदा कोकाटे यांना, द्वितीय क्रमांक दिपाली मराठे, आणि तृतीय क्रमांक डॉ.मीनल आरेकर यांना मिळाला, तर विजय कामत आणि सिमरन दराडे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. हे पुरस्कार अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोकण प्रांत अध्यक्ष आणि पत्रकार दुर्गेश सोनार तसेच संस्थेचे कार्यवाह प्रवीण देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकारिता वर्गाच्या वर्ग-समन्वयक  नम्रता कडू यांनी केले.डॉक्टर नरेंद्र पाठक आणि प्रशांत कुलकर्णी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कार विजेत्या माजी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षणपत्रकार