Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यात भाजपला धक्का; रोहिदास मुंढेंचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

By अजित मांडके | Updated: October 21, 2023 16:28 IST

राज्य पातळीवर जरी शिवसेना भाजप यांच्यात एकी दिसत असली तरी स्थानिक पातळीवर मात्र आजही खटके उडत असल्याचे चित्र आहे.

ठाणे : दिव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दिव्याचे माजी मंडल अध्यक्ष रोहिदास मुंढे यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची मशाल हाती घेतली. यामुळे दिव्यात भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. सत्ताधाऱ्यांना अंगावर घेऊनही डावलले गेल्याने अखेर मुंढे यांनी हा प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

राज्य पातळीवर जरी शिवसेना भाजप यांच्यात एकी दिसत असली तरी स्थानिक पातळीवर मात्र आजही खटके उडत असल्याचे चित्र आहे. त्यातही शहरातील दिवा हा नेहमीच शिवसेना विरुध्द भाजप यांच्यातील वादाचा दिवा ठरला होता. परंतु मधल्या काळात भाजपमधून निलेश पाटील आणि आदेश भगत यांनी भाजपचे कमळ खाली टाकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला पोकळ निर्माण झाली अशी चिन्हे वाटत होती. परंतु रोहिदास मुंढे यांच्या खांद्यावर त्यावेळेस दिवा मंडल अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिव्यात भाजपला जिवंत ठेवण्याचे काम केले.

वारंवार विविध प्रश्नांवर, समस्यांवर आंदोलन करणे, डम्पींगच्या प्रश्नाला वाचा फोडणे आदींसह इतर काही मुद्दे हाती घेऊन त्यांनी शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मध्यंतरी नव्याने जाहीर झालेल्या पक्षाच्या कार्यकारणीत त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर ते नाराज झाले, तसेच त्यांना पक्षातूनही डावलण्यात आल्याचे दिसून आले. अखेर याला सर्वांवर नाराज होऊन मुंढे यांनी शनिवारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्री येथे हा प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पक्ष प्रवेश केला. पक्षाने डावलल्यानेच आपण पक्ष सोडल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय भस्मासुरांना जाळण्यासाठी मशाल हाती घ्यावीच लागेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मुंढे यांनी भाजपला जय महाराष्ट्र केल्याने आता भविष्यात या पट्यात मशाल विरुध्द धणुष्यबाण असाच संघर्ष पहावयास मिळणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपाशिवसेना