Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, कधी मिळेल स्वच्छ हवा?! वायू प्रदूषण रोखण्यासाठी नव्या नगरसेवकांनी ठोस भूमिका घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:16 IST

अभ्यासकांचा सूर, ही धूळ केवळ कामगारांपुरती मर्यादित न राहता थेट मुंबईकरांच्या घरांपर्यंत पोहोचत आहे.  

सचिन लुंगसेमुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला गेल्या अनेक दिवसांपासून वायू प्रदूषणाचा विळखा पडला आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करताना दिसत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना राबवूनही प्रदूषणावर अपेक्षित नियंत्रण मिळवता आलेले नाही. भविष्यात हा प्रश्न  गुंतागुंतीचा होऊ नये यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रशासन व राज्य सरकारच्या समन्वयाने वायू प्रदूषणावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा तज्ज्ञ अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

मुंबईच्या वायू प्रदूषणावर गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या ‘आवाज फाउंडेशन’च्या सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले की, मुंबईतील प्रदूषण ही नवी समस्या नाही. शहराचा वेगाने आणि विस्कळीत विस्तार, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली पायाभूत कामे, गगनचुंबी इमारतींचे बांधकाम आणि वाढती वाहनसंख्या यामुळे परिस्थिती बिघडते आहे.  सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही राजकारणापलीकडे जाऊन मुंबईकरांच्या श्वासासाठी एकत्र काम करावे.  सर्वप्रथम वायू प्रदूषणाबाबत स्पष्ट धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्या प्रभागात कशी होईल, यासाठी काम करणे गरजेचे आहे. 

‘वातावरण फाउंडेशन’चे भगवान केसभट यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत मुंबईतील प्रदूषणाची पातळीही दिल्लीसारखीच धोकादायक होत चालली आहे. दिल्लीमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या पद्धतीने उपाययोजना केल्या, त्या धर्तीवर मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काम करणे आवश्यक आहे. कामगार प्रश्नांचे अभ्यासक बिलाल खान यांनी बांधकाम क्षेत्रातील प्रदूषणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मुंबईत मोठ्या प्रमाणावर इमारती, रस्ते आणि पूल उभारले जात असून या धुळीचा मोठा फटका कामगारांना बसतो. ही धूळ केवळ कामगारांपुरती मर्यादित न राहता थेट मुंबईकरांच्या घरांपर्यंत पोहोचत आहे.  

लोकप्रतिनिधींनी जनतेसोबत संवाद वाढवला पाहिजे.  संपर्कासाठी मोबाईल क्र., व्हॉट्सॲप क्र., ई-मेल आयडी, इंस्टाग्राम जनतेसाठी उपलब्ध करून जनतेचे प्रश्न सरकारपुढे मांडायला हवे. - अविनाश कुबल, निसर्ग अभ्यासक

वांद्रे-कुर्ला संकुल, कलिना, सांताक्रुझ, विलेपार्ले परिसरातही प्रदूषणाचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. येथे नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षभेद न ठेवता सर्वसामान्यांच्या बाजूने भूमिका घ्यावी.- ॲड. राकेश पाटील, कुर्ला 

गोवंडी, मानखुर्दसह लगतच्या परिसरात डम्पिंग ग्राउंड आणि इतर घटकांमुळे प्रदूषणाचा प्रश्न जटिल बनला आहे. नवीन नगरसेवकांनी हाच जुना प्रश्न नव्या दृष्टिकोनातून प्रभावीपणे मांडावा, अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे पुढील पिढ्यांना स्वच्छ हवा मिळेल.- ॲड. फय्याज शेख, गोवंडी

बोरीवली, मालाड परिसरात वाढत्या बांधकामांमुळे प्रदूषण वाढत आहे. विकासकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे; मात्र प्रत्यक्ष कारवाई करणारी यंत्रणा अपुरी पडते.- विनोद घोलप, मालाड

English
हिंदी सारांश
Web Title : When will we get clean air? Act now, councilors!

Web Summary : Mumbai grapples with severe air pollution from construction and traffic. Experts urge newly elected councilors to prioritize concrete solutions, collaborate across party lines, and enforce pollution control measures for a healthier future.
टॅग्स :वायू प्रदूषण