Join us

भाजपमध्ये जुन्यांना धाकधूक अन्‌ नव्यांच्या आशा पल्लवित; मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार?

By यदू जोशी | Updated: December 3, 2024 08:48 IST

फडणवीसांकडे अनेकांची फिल्डिंग

यदु जोशी

मुंबई : भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार की जुन्यांनाच पुन्हा मंत्री करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबरदस्त फिल्डिंग लावली आहे. मंत्रिमंडळाचा चेहरा अनुभवी असावा, असे कारण देत जुन्यांसाठी आग्रह धरला जात आहे, तर दुसरीकडे तेच ते चेहरे किती दिवस, असे विचारत अन्य आमदारांचे लॉबिंग सुरू आहे.

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दहा मंत्री होते. हे सर्वजण पुन्हा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्या सगळ्यांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या वाट्याला २० हून अधिक मंत्रिपदे येऊ शकतात. तीन-चार-पाच टर्मचेही असे अनेक आमदार आहेत की ज्यांना आजवर मंत्रिपद मिळालेले नाही.

डॉ.संजय कुटे, आशिष शेलार, अशोक उईके यांच्यासारखे मोजके आमदार असेही आहेत ज्यांना २०१९ मध्ये जाता-जाता चार महिन्यांसाठी मंत्रिपद मिळाले होते. त्यामुळे यावेळी असे आमदारदेखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा सातव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत.

‘गुजरात पॅटर्न’ने वाढविले टेन्शन 

मंत्रिपद मिळावे यासाठी अनेक जण फडणवीस यांना भेटत आहेत. फडणवीस कोणालाही ‘शब्द’ देत नाहीत. पक्षनेतृत्वाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगतात. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. ‘गुजरात पॅटर्न’ राबवून सगळेच नवीन चेहरे दिले जाणार असल्याची चर्चा जोरात असल्याने मंत्रिपदी राहिलेल्यांचे टेन्शन वाढले आहे. पक्षाचे १३२ आमदार आहेत आणि २०-२२ मंत्रिपदे मिळाली तर कोणाकोणाचे समाधान करायचे, हा प्रश्न फडणवीस यांच्यासमोरदेखील आहे.

तेव्हा मंत्री, नंतर डच्चू, आता...?

चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी पाटील-निलंगेकर, जयकुमार रावल, सुभाष देशमुख,  विजय देशमुख, विद्या ठाकूर, आशिष शेलार, योगेश सागर, पंकजा मुंडे, डॉ.संजय कुटे, राम शिंदे, अशोक उईके, परिणय फुके हे २०१४ ते २०१९ दरम्यानच्या फडणवीस मंत्रिमंडळात होते. 

काही जणांना चार महिनेच मंत्रिपद मिळाले होते. २०२२ मध्ये त्यांना संधी मिळाली नाही. आता त्यांची मंत्रिपदासाठी दावेदारी आहे.

विधान परिषदेतील लॉटरी कोणाला ?

पंकजा मुंडे, राम शिंदे आणि परिणय फुके हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. विधान परिषदेतील आमदाराला मंत्रिपद देण्याचा निर्णय होईल का याबाबत उत्सुकता आहे.

किमान आठ जिल्हे असे आहेत की भाजपअंतर्गत दोन किंवा तीन जण मंत्रिपदाचे तगडे दावेदार आहेत. तिथे एकाला संधी देताना भाजपची कसरत होणार आहे.  

या ज्येष्ठांना न्याय कधी?

माजी मंत्री गणेश नाईक यांना २०१४ मध्ये वा महायुती सरकारमध्येही मंत्रिपद मिळाले नव्हते. ते सहा टर्मचे आमदार आहेत. अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे हे सातव्यांदा आमदार आहेत. मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती सहाव्यांदा जिंकले आहेत. वडाळा; मुंबईचे कालिदास कोळंबकर तर नवव्यांदा आमदार आहेत. किसन कथोरे पाचव्यांदा आमदार आहेत.

बावनकुळेंना मंत्रिपद?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीपर्यंत त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम ठेवले जाईल आणि नंतर मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशीही एक चर्चा आहे. बावनकुळेंना लगेच मंत्री केले तर राम शिंदे किंवा आशिष शेलार यांच्यापैकी एकाला प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, असेही म्हटले जाते.

यांचे मंत्रिपद कायम राहणार का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, डॉ. विजयकुमार गावित, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण हे शिंदे सरकारमध्ये मंत्री होते. हे सगळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतील का याची उत्सुकता आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४