Mumbai Local Train Updates: लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गोरेगाव- सीएसएमटी हार्बरमार्ग ३ महिने राहणार बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 06:54 IST2026-02-06T06:53:15+5:302026-02-06T06:54:32+5:30
Goregaon CSMT Harbour Line Train Update: मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर ५व्या, ६ व्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे.

Mumbai Local Train Updates: लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गोरेगाव- सीएसएमटी हार्बरमार्ग ३ महिने राहणार बंद!
महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
Goregaon CSMT Train Cancelled: पश्चिम रेल्वे मार्गावर ५व्या, ६ व्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. नव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे-खार रेल्वेपूल पाडून त्याच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सध्या त्याचे नियोजन सुरू असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल-बोरीवलीदरम्यान नवीन मार्गिकेचे काम सुरू आहे. सध्या वांद्रे ते बोरीवलीदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका उपलब्ध झाली आहे. परंतु माहीम-सांताक्रूझ दरम्यान जागा उपलब्ध नसल्याने हे काम रखडले. २०२४ मध्ये या कामासाठी ६ महिन्यांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन होते. मात्र, प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी यासाठी हा कालावधी ३ महिने करण्यात आला. या प्रकल्पासाठी ९६४.८४ कोटी खर्च होणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्यास मुदत देण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात फेऱ्या कपात
सध्या गोरेगाव-सीएसएमटी दरम्यान ८८, तर वांद्रे-सीएसएमटी दरम्यान १०६ लोकल फेऱ्या आहेत. या माध्यमातून एकूण ३.६२ लाख प्रवासी पश्चिम रेल्वेमधून मध्य रेल्वेकडे प्रवास करतात. यामध्ये दादर, प्रभादेवी, माहीम आणि वसई रोड मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. ब्लॉकदरम्यान गोरेगाव-सीएसएमटी विभागात लोकल सेवांमध्ये मोठी कपात करावी लागेल. परिणामी याचा फटका लाखो प्रवाशांना बसणार आहे. मात्र, या काळात वांद्रे-सीएसएमटी मर्यादित सेवा सुरू ठेवण्यात येऊ शकतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
जमीन अधिग्रहणाची अडचण
प्रकल्पातील मोठे आव्हान म्हणजे जमीन अधिग्रहण. महालक्ष्मी-लोअर परेल येथील शक्ती मिलच्या ८८.५७३ चौ. मी. जमिनीचा वाद न्यायालयात आहे. तसेच वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमधील १५५ प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन एमएमआरडीएकडे प्रलंबित आहे.
भविष्यासाठी ब्लॉक आवश्यक
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते ५वी व ६वी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट-बोरीवली तसेच पुढे सीएसएमटीपर्यंत लोकल सेवा अधिक सुरळीत होतील. चर्चगेट-बोरीवली-विरार दरम्यान लोकल फेऱ्यांमध्येही वाढ शक्य होणार आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना तीन महिन्यांच्या कठीण कालावधीसाठी तयार राहावे लागणार आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे डोकेदुखी
पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वांद्रे पूर्वेकडील बाजूला ५वी मार्गिका काही वर्षांपूर्वीच तयार करण्यात आली होती, मात्र तत्कालीन राजकीय व स्थानिक विरोधामुळे ती आजपर्यंत कार्यान्वित होऊ शकली नाही. २०१७-१८ दरम्यान सुमारे १० कोटी रुपये खर्चून ही लाइन उभारली होती. ही मार्गिका सुरू झाली असती, तर आजचा पूल पाडण्याचा प्रश्नच उद्भवला नसता आणि गोरेगाव-सीएसएमटी लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची वेळ आली नसती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा प्रकल्प महत्त्वाचा असून पूर्ण झाल्यावर रेल्वे मार्गिकेची क्षमता वाढविण्यासाठी मदत होणार आहे. काम सुरू होण्याची तारीख निश्चित झालेली नाही. परंतु प्रवाशांना कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे