Mumbai Central Line Local:कर्जत आणि भिवपुरी या स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेची मध्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास कर्जत-भिवपुरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे काही लोकल गाड्या थांबवण्यात आल्या असून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी कर्जतसह मुंबईच्या दिशेची लोकल सेवा खोळंबली असून गाड्या उशिराने धावत आहेत.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सुरू असून लवकरच लोकल सेवा पूर्ववत होईल, असं सांगण्यात आलं आहे.