Join us

पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 08:41 IST

अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली नियमभंग करून प्रभागरचना व आरक्षण

मुंबई : ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकांच्या निवडणुकीत सध्याची तीन-चार नगरसेवकांचा प्रभाग पद्धत रद्द करून, मुंबईप्रमाणे 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करावी, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे मंगळवारी केली. तसेच, दुबार मतदार आणि मतदारयाद्यांतील घोळ दूर करण्यासाठी तातडीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवावा, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत व मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात चोकलिंगम यांची भेट घेऊन १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नोंदणी मोहीम राबवावी, दुबार मतदार आढळल्यास इतर ठिकाणांहून वगळावे, मतदारांचा डेटा सर्व पक्षांना संपादनयोग्य डिजिटल फॉरमॅटमध्ये द्यावा, व्हीव्हीपॅटची १०० टक्के मोजणी करून ती ईव्हीएमसोबत टॅली करावी, बूथ लेव्हल ऑफिसरची संख्या वाढवावी आदी सूचना या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

प्रभागरचना व आरक्षणावर नियंत्रण नाही

महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली नियमभंग करून प्रभागरचना व आरक्षण करतात; त्यावर राज्य निवडणूक आयोगाचे नियंत्रण नसल्याचा आरोपही मनसेने केला. 

टॅग्स :मुंबईमनसेमुंबई महानगरपालिका