- मनोहर कुंभेजकर, मुंबईआशियाई देशांमध्ये एकाएकी कोरोनाची दहशत वाढली असून, हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं रुग्णसंख्येत भर पडताना दिसत आहे. सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत २८ टक्क्यांची वाढ झाली. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या दोन आठवड्यांमध्ये भारतही या संसर्गाच्या विळख्यात येत असल्याचं चित्र आहे. देशात गेल्या आठवड्यात ५८ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता ९३ वर पोहोचली आहे.
भारतात कोरोना चाचण्यांची संख्या कमी असतानाही रुग्णसंख्या वाढलेल्यानं आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.त्यामुळे राज्यात ठोस उपाययोजना राबवून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची विमानतळावर तपासणी करावी, अशी विनंती माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
पुन्हा एकदा सार्स कोवी या विषाणूचा नवा व्हेरिएंट एल फ७ , एनबी१.८ हे जे.एन १ च्या वंशावळीतील आहेत अशी माहिती मिळते. यासाठी रोग प्रतिबंधक शक्ति म्हणजे ईम्युनिटी ज्या नागरिकांमध्ये कमी आहे, ज्यांना सहव्याधी आहे त्याना धोका संभवतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्स महत्वाच्या आहेत. तसेच जेएन १.७ याचा प्रादुर्भाव होऊ घातला आहे. सुट्टीचे दिवस असल्याने हजारो पर्यटक सिंगापूर हॅागंकॅाग येथून मुंबई महाराष्ट्र व हिंदुस्थानात येणार आहेत यावेळी इन्फेक्शन रेट वाढेल असे वाटते. आपण याबाबत त्वरित पावले उचलली पाहिजे, अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टींग वाढवणे आवश्यक आहे. सध्या मुंबई व महाराष्ट्रात फॅमिली डॅाक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांकडे या आजाराच्या लक्षणा कडे पाहाणे आवश्यक आहे. सध्या अँन्टीफ्ल्यू सतत वापरले जात असून ते लवकर ड्रग रेझिस्टंट येऊ शकेल का ? याचा ही विचार व्हावा असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.