“अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे”; CM फडणवीसांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:39 IST2025-05-28T11:39:20+5:302025-05-28T11:39:52+5:30

CM Devendra Fadnavis: राज्यभरात संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली.

immediate assessment of the damage to farms and houses caused by heavy rains should be carried out cm devendra fadnavis directs | “अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे”; CM फडणवीसांचे निर्देश

“अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे”; CM फडणवीसांचे निर्देश

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शेती व घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.

या बैठकीत अतिवृष्टी, धरणांमधील पाणीपातळी, पिकांची स्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांनी सादरीकरण करताना सांगितले की, 'सचेत' प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत १९ कोटींहून अधिक सतर्कतेचे संदेश नागरिकांना पाठवण्यात आले आहेत. राज्य आपत्कालीन केंद्रामध्ये अत्याधुनिक संवाद यंत्रणा व निर्णय सहाय्य प्रणाली कार्यरत आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर व धुळे येथे प्रत्येकी दोन पथके सज्ज ठेवण्यात आली असून, नांदेड आणि गडचिरोलीकडे ही पथके रवाना झाली आहेत. राज्यभरात संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आतापर्यंत वीज पडणे, भिंत कोसळणे, झाडे पडणे आणि पाण्यात बुडणे अशा घटनांमुळे राज्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत देण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले. बैठकीत उजनी धरणाच्या जलसाठ्यात अकरा टीएमसीने वाढ झाली तसेच पावसामुळे टँकरची संख्या काहीशी कमी झाली असली तरी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

 

Web Title: immediate assessment of the damage to farms and houses caused by heavy rains should be carried out cm devendra fadnavis directs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.