Join us

सेन्सॅारच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा; मल्लिका अमरशेख यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 08:35 IST

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख यांनी सेन्सॉरच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सेन्सॅार बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोण नामदेव ढसाळ? असा प्रश्न विचारत ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटातून त्यांची कविता काढण्याची सूचना केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख यांनी सेन्सॉरच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

मल्लिका यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला ‘ढसाळ’ चित्रपटाचे निर्माते संजय पांडे, लेखिका-दिग्दर्शिका वरुणा राणा उपस्थित होत्या. मल्लिका म्हणाल्या की,  ढसाळांना न ओळखणाऱ्या अधिकाऱ्याला सेन्सॅार बोर्डावरून तत्काळ काढा. नामदेव ढसाळ यांना ओळखत नाही, असे म्हणणे ही खूप मोठी शोकांतिका आहे.  

कॉपीराइटचेही उल्लंघन

दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी ‘चल हल्ला बोल’मध्ये ढसाळ यांच्या कविता वापरण्यापूर्वी परवानगी घेतली नसल्याचे सांगत मल्लिका म्हणाल्या की, त्यांनी कॉपीराइटचे उल्लंघन केले आहे. नामदेव यांचे वारस म्हणून त्यांच्या साहित्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. या विरोधात कायदेशीर न्यायालयीन लढा देईन, असेही त्या म्हणाल्या.

‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट मल्लिका अमरशेख यांनी पाहिला नसल्याने त्या आक्षेप घेत आहेत. हा ढसाळ यांचा चरित्रपट नाही. या आजच्या काळातील चित्रपटात ७०-७५ मधील दलित पँथर आणि युवा क्रांती दल चळवळींच्या आंदोलनाचा फ्लॅशबॅक आहे. - महेश बनसोडे, दिग्दर्शक

 

टॅग्स :सिनेमा