IMA's seven-day ultimatum to the state government, ... otherwise it will stop work | आयएमएचा राज्य सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम, ...अन्यथा करणार काम बंद आंदोलन

आयएमएचा राज्य सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम, ...अन्यथा करणार काम बंद आंदोलन

मुंबई : खासगी रुग्णालयाची दर निश्चिती आणि इतर मुद्द्यांवर गेल्या आठवड्यात आंदोलन केल्यानंतरही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र यांनी सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील खासगी डॉक्टर काम बंद करतील, असा इशारा आयएमए महाराष्ट्रने सोमवारी दिला.
कोरोना काळात सरकारने सर्व खासगी रुग्णालयांसाठी दर निश्चित केले आहेत. या दरांनुसारच बिल आकारणी करणे रुग्णालयांना बंधनकारक आहे. अधिक आकारणी केल्यास कारवाईला समोरे जावे लागत आहे. आयएमए आणि खासगी रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, हे दर खूपच कमी आणि अन्यायकारक आहेत. त्यामुळे यात बदल करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून आयएमएकडून केली जात आहे. मात्र, सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याचवेळी खासगी डॉक्टरांच्या सुरक्षेसह अन्य अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारच्या या उदासीन धोरणाला कंटाळलेल्या आयएमएने गेल्या आठवड्यात आंदोलन केले. एमएमसी नोंदणीपत्राची प्रतीकात्मक होळी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली. तरीही, सरकार काही लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केला.
सरकारी दरानुसार खासगी रुग्णालय चालविणे आता डॉक्टरांना शक्य नाही. त्यामुळे आजच्या घडीला राज्यातील अडीच हजार मध्यम खासगी रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर असल्याचेही भोंडवे यांनी सांगितले. तेव्हा आता सर्वच रुग्णालये सरकारने चालवावीत, असे ते म्हणाले. येत्या सात दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील ४५ हजार आयएमए डॉक्टर काम बंद करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IMA's seven-day ultimatum to the state government, ... otherwise it will stop work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.