‘एमपीटी’ला लाखो लीटर पाण्याचा बेकायदा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 00:53 IST2020-01-08T00:53:53+5:302020-01-08T00:53:59+5:30
गेली १७ वर्षे दररोज लाखो लीटर पाण्याचा अनधिकृतपणे पुरवठा होत असल्याचा खळबळजनक आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंगळवारी पालिकेच्या महासभेत केला.

‘एमपीटी’ला लाखो लीटर पाण्याचा बेकायदा पुरवठा
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टमधील काही वसाहतींमध्ये महापालिकेच्या अभियंत्यांकडून गेली १७ वर्षे दररोज लाखो लीटर पाण्याचा अनधिकृतपणे पुरवठा होत असल्याचा खळबळजनक आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंगळवारी पालिकेच्या महासभेत केला. बोटी धुण्यासाठी या पाण्याचा वापर केला जात होता़ यामुळे महापालिकेचा आतापर्यंत सुमारे ६८० कोटी रुपये महसूल बुडाल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला़ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले़ तसेच संबंधित अभियंत्यांच्या बढत्या रोखण्यात आल्या आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत त्यांच्या वसाहतींना पाणीपुरवठा केला जात नाही़ त्यामुळे तत्कालीन नगरसेवकाच्या प्रयत्नाने या वसाहतींमधील निम्म्या रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यास पालिकेने सुरुवात केली़ मात्र काही वसाहतींमध्ये त्यानंतरही पाणीपुरवठा होत नव्हता, तिथे पालिकेच्या दोन जल अभियंत्यांनी बेकायदा जलजोडणी देऊन ४० रुपयांत मिळणाऱ्या एक हजार लीटर पाण्यासाठी तब्बल ४५० रुपये प्रति एक हजार लीटर इतका दर आकारला़ गेली १७ वर्षे जलअभियंता खात्यातील काही अधिकाऱ्यांमार्फत हा घोटाळा राजरोस सुरू असल्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी निदर्शनास आणले.
पालिकेचे पाणी जास्त दराने विकण्याचा प्रकार कोळसा बंदर, रेती बंदर, लाकडी बंदर भागातही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला़ मात्र या अधिकाºयांवर कारवाई करण्याऐवजी पालिका प्रशासनाने त्यांच्या बढतीचा प्रस्ताव मंगळवारी महासभेत मांडला़ या अधिकाºयांची बढती रोखण्याची मागणी नगरसेवकांनी केली़ विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी या घोटाळ्याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यानुसार या प्रकरणाची एका महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश महापौरांनी दिले़
हा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
>दामदुप्पट दरात पाणीपुरवठा
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही़ मात्र स्थानिक नगरसेवकाच्या मागणीनंतर एक हजार लीटर पाण्यासाठी ४० रुपये दर आकारून पाणीपुरवठा सुरू झाला़ परंतु, उर्वरित रहिवाशांना बेकायदा पाणीपुरवठा करून त्यांच्याकडून प्रति हजार लीटर ४५० रुपये वसूल करण्यात येत आहेत.दररोज या ठिकाणी तीन लाख ६० हजार लीटर पाणीपुरवठा केला जात आहे़
>अभियंत्यांची बढती रोखली
पालिकेच्या जल विभागातील उपप्रमुख अभियंता संजय जाधव, बाळासाहेब साळवे, अजय राठोर, अरुण भोईर, विवेक मोरे यांची बढती सेवाज्येष्ठतेनुसार प्रमुख अभियंता पदावर करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने महासभेत मांडला होता. मात्र यातील अजय राठोर आणि बाळासाहेब साळवे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये बेकायदा पाणीपुरवठा केल्याचा आरोप करीत बढती रोखण्याची मागणी जाधव यांनी केली. या उपसूचनेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे संबंधित दोन अभियंत्यांची बढती चौकशी अहवाल येईपर्यंत रोखण्यात आली आहे़