स्त्री-बीजाची बेकायदा विक्री; ८६० आयव्हीएफ सेंटर रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:40 IST2026-03-05T04:40:21+5:302026-03-05T04:40:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे गरीब महिलांचे दिशाभूल करून त्यांच्या स्त्री-बीजांची बेकायदा विक्री केल्याच्या प्रकाराची ...

स्त्री-बीजाची बेकायदा विक्री; ८६० आयव्हीएफ सेंटर रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे गरीब महिलांचे दिशाभूल करून त्यांच्या स्त्री-बीजांची बेकायदा विक्री केल्याच्या प्रकाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ८६० आयव्हीएफ केंद्रांची पोलिस व आरोग्य विभागामार्फत संयुक्त झाडाझडती घेण्यात येणार आहे. अनियमितता आढळल्यास संबंधित केंद्रांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
या प्रकरणी विधान परिषदेत भाजप आ. चित्रा वाघ यांनी लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले. संबंधित आयव्हीएफ केंद्राला नाशिकमध्ये परवाना असताना ठाण्यात महिलांची फसवणूक करून स्त्री-बीज तस्करी केल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देताना सांगितले की, महिलांना स्त्री-बीज काढण्यासाठी आंध्र प्रदेशसारख्या राज्यांत नेले जात असल्याची बाब समोर आली आहे. उपचारानंतर योग्य वैद्यकीय काळजी न दिल्याचेही निदर्शनास आले आहे.
आयव्हीएफ केंद्र परवानगी प्रक्रिया ऑनलाइन
या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयव्हीएफ केंद्रांच्या परवानगी प्रक्रियेला ऑनलाइन करण्यात येणार असून, महिलांचे आधार कार्ड लिंक करण्याचा विचार आहे. तसेच सर्व केंद्रांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले.
बदलापूर स्त्री बीज प्रकरणात आयव्हीएफ सेंटरचा संचालक डॉ.अमोल पाटील याला नाशिकमधून अटक केली. त्याला बुधवारी चिखलोली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटर ठाण्यात चालवले जात असल्याची माहिती समोर आली होती. बदलापूरमधील स्त्री बीज प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. त्याची व्याप्ती राज्यभर पसरल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार, कारवाई सुरू आहे. चार महिलांना या आधीच अटक करण्यात आली होती. डॉ.अमोल पाटील याला अटक झाल्याने आता हे प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.