Join us

आयआयटी मुंबईमध्ये दिल्लीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल; मध्यरात्री हॉस्टेलच्या छतावरून उडी मारल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:53 IST

आयआयटी मुंबईतल्या एका विद्यार्थ्याने मध्यरात्री इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

IIT Bombay: शुक्रवारी मध्यरात्री आयआयटी मुंबईमध्ये आणखी एक दुर्दैवी घटना घडली. मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आयआयटी मुंबईमध्ये एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने शुक्रवारी मध्यरात्री वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. 

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे अडीच वाजता घडली. दिल्ली येथील रहिवासी असलेल्या रोहित सिन्हा या विद्यार्थ्याला घटनेनंतर जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर आयआयटी परिसरात शोककळा पसरली आहे.

रोहित सिन्हा हा आयआयटी बॉम्बेमध्ये मेटा सायन्स विभागात चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने रात्री उशिरा वसतिगृहाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. ही दुर्घटना घडताच वसतिगृहाच्या छतावर उपस्थित असलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. यानंतर लगेचच रोहितला जवळच्या हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले, पण तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर पवई पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला आणि विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागील कारणे शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. आतापर्यंत या घटनेशी संबंधित कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. रोहितने इतके मोठे पाऊल का उचलले हे जाणून घेण्यासाठी पोलिस विद्यार्थी आणि कुटुंबीयांचीही चौकशी करत आहेत.

काही दिवसांपूर्वी आयआयटी खरगपूर कॅम्पसमध्येही चौथ्या वर्षाच्या बीटेकच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होत. तो त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत लटकलेला आढळला.२१ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी रितल मोंडल हा कॅम्पसमधील राजेंद्र प्रसाद (आरपी) हॉल हॉस्टेलमध्ये त्याच्या खोलीत लटकलेला आढळला होता.

टॅग्स :आयआयटी मुंबईमुंबई पोलीस