Join us

गडकिल्ले भाड्याने दिल्यास माझ्याशी गाठ - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 02:26 IST

उत्पन्न हवे तर बंगले द्या

डोंबिवली : गडकिल्ले भाड्याने देण्यापेक्षा मंत्र्यांनी त्यांचे बंगले भाड्यानी द्यावेत. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी दिला. राज्यातील सरकार नालायक असून कोणीही कसलेही निर्णय घेत आहे. देशात दोघे आणि राज्यात एक व्यक्ती निर्णय घेत आहे, असा टोला त्यांनी मोदी शहा जोडगोळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट नामोल्लेख न करता लगावला.

ठाकरे हे शनिवारपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे. मात्र सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. भाजप ईव्हीएमच्या मदतीने निवडून येत असल्याने निर्णय घेताना लोकांना विश्वासात घेत नाही.

ईडीच्या चौकशीबाबत ठाकरे म्हणाले की, मी एकमेव असा व्यक्ती आहे की थेट ईडीला सामोरा गेलो. २१ तारखेला आमचे आंदोलन होते आणि २२ तारखेला ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस येते हे काही न समजण्यासारखे आहे का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. मतपेटीद्वारे निवडणुका घ्याव्यात ईव्हीएमद्वारे नको या मागणीवर पक्ष ठाम आहे, असेही ते म्हणाले.

चांद्रयान मोहीमेबद्दल ते म्हणाले की, या मोहिमेवर ८०० कोटींचा खर्च झाला असे सरकार सांगते. चंद्रावर सर्वप्रथम कोणी पाऊल ठेवले, असे विचारताच आपण निल आर्मस्ट्राँग सांगतो. त्यानंतर जगातील कोणीच का गेले नाही याचा विचार आपण का करीत नाही? असा सवाल त्यांनी केला.

आपल्या अर्धा देश नागड्या अवस्थेत असून इथे अनेकांना अन्नपाण्याची भ्रांत आहे, त्यामुळे मूलभूत समस्या सोडवण्याकरिता ठोस काम करायचे सोडून अन्य ठिकाणी नागरिकांचे लक्ष गुंतवायचे हे कितपत योग्य आहे, असे ते म्हणाले. या देशातील नागरीक सुशिक्षित आहेत पण सूज्ञ नाहीत ही शोकांतिका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका नंतर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :राज ठाकरेदेवेंद्र फडणवीसमनसे